Join us

दिग्दर्शनात घराणेशाही अपयशीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM

घराणेशाही केवळ राजकारणातच नसते. बॉलिवूडमध्येदेखील कुटुंबाचा वारसा संभाळण्यासाठी अनेक स्टार मंडळींनी आपल्या वारसदारांना अभिनयाच्या क्षेत्रात उतरविले आणि यातले अनेक ...

घराणेशाही केवळ राजकारणातच नसते. बॉलिवूडमध्येदेखील कुटुंबाचा वारसा संभाळण्यासाठी अनेक स्टार मंडळींनी आपल्या वारसदारांना अभिनयाच्या क्षेत्रात उतरविले आणि यातले अनेक जण यशस्वीही झाले आहेत. मात्र दिग्दर्शनात घराणेशाही जास्त यशस्वी ठरली नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण शोमॅन राजकपूर आहेत. त्यांचे तीनही मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर अभिनेता झाले, तिघेही दिग्दर्शनात आले. परंतु यशस्वी होऊ श्कले नाहीत. म्हणूनच तिघांमधून कोणीही दिग्दर्शनात पुनरागमनाचा प्रयत्न केला नाही. असे आणखी एक कुटुंब आहे, ज्यांच्या दुसरी पिढीने आपल्या वडिलांचा वारसा संभाळला, मात्र यशाच्या बाबतीत दोन्ही कुटुंबांची पुढची पिढी वेगळ्य़ा मार्गावर गेली. बी.आर. चोपडा यांनी आपल्या चित्रपटांनी यशाचा इतिहास रचला. मात्र नुकतेच निधन झालेले त्यांचे पुत्र रवी चोपडा यांना दिग्दर्शनात आपल्या वडिलांप्रमाणे यश मिळाले नाही. रवी चोपडा यांच्या दिग्दर्शनातील यशस्वी चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला बागवां होता. ज्याची पटकथा बी.आर. यांनी खूप पूर्वी लिहिली होती. अमिताभ सोबत त्याच लाईनवरील रवी चोपडा यांच्या बाबूल चित्रपटाला मात्र यश मिळाले नाही. आदित्य चोपडा यांनी मात्र वडिलांच्या यशाचा वारसा सांभाळला. आदित्य चोपडाने यश चोपडा असतानाच यशराजची जबाबदारी संभाळली होती. यशाच्या बाबतीत आदित्य कुठेही आपल्या वडिलांपेक्षा मागे नाही. त्याने खूप वर्षानंतर दिग्दर्शनात पुनरागमानाची घोषणा केली व त्यासाठी त्याने आपल्या वडिलांचा जन्मदिवस निवडला. घोषणेच्या वेळी वडिलांसोबतच्या संवादाचे एक भावनिक पत्रदेखील मीडियाच्या नावाने काढले. नासिर हुसैन आपल्या काळातील एक यशस्वी निर्माते राहिले. त्यांचे पुत्र मंसूर खानदेखील यशाच्या शिखरावर पोहचले. आमीर खानसोबत मंसूर यांनी कयामत से कयामत तकच्या यशाचा इतिहास लिहिला. जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जोश चित्रपटांच्या यशानंतर मात्र ते दिग्दर्शनापासून दूर होत गेले. बीआर आणि यश चोपडा यांच्या काळातीलच आणखी एक निर्माते रामानंद सागर यांचे दोघ मुले प्रेम आणि मोती सागर दिग्दर्शनात आले, मात्र आपल्या वडिलांसारखे यश मिळवू शकले नाही.