महाकुंभ मधून व्हायरल झालेल्या मोनालिसाला (Monalisa) सिनेमात काम करण्याची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्रा (Sanoj Mishra) अडचणीत सापडला आहे. त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला असून नबी करीम ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली. एका छोट्याशा गावातून आलेल्या मुलीला सिनेमात घेण्याचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्या मुलीच्याच तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २०२० साली टिकटॉक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख सनोज मिश्राशी झाली. काही महिन्यांच्या ओळखीनंतर १७ जून २०२१ रोजी सनोजने तिला फोन करुन सांगितले की तो झाशी रेल्वे स्थानकावर पोहोचला आहे. सामाजिक दबावामुळे पीडितेने भेटण्यासाठी नकार दिला. मात्र सनोजने तिला आत्महत्येची धमकी दिली. पीडिता घाबरुन त्याला भेटायला गेली. तो तिला एका रिसॉर्टवर घेऊन गेला आणि तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत वाईट कृत्य केलं. याचं त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं. इतकंच नाही तर सनोजच्या बळजबरी अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. बऱ्याचदा तिला गर्भपातही करावा लागला.
फेब्रुवारी २०२५ मध्ये सनोजने तिला सोडलं आणि तक्रार केलीस तर प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. दिल्ली पोलिसांनी पीडितेच्या या तक्रारीनंतर चौकशी केली. सनोजने जामिनासाठी अर्ज केला असता कोर्टाने तो अमान्य केला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
सनोज मिश्रा यावर्षी चर्चेत आला होता. प्रयागराज येथील महाकुंभमध्ये मोनालिसा ही सुंदर मुलगी खूप व्हायरल झाली होती. तिचे आकर्षक डोळे, सौंदर्य यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते. सनोज मिश्राने मोनालिसाला सिनेमात घेण्याचं आश्वासन दिलं होतं. 'द मणिपूर डायरी' असं सिनेमाचं नाव होतं.