Join us

नायिकांनाही दिग्दर्शनाचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:12 AM

दिया मिर्जाने नुकतीच घोषणा केली की, ती लवकरच दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २0१६च्या मध्यापर्यंत तिच्या ...

दिया मिर्जाने नुकतीच घोषणा केली की, ती लवकरच दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २0१६च्या मध्यापर्यंत तिच्या दिग्दर्शनात तयार होणार्‍या चित्रपटाची सुरुवात होईल. तिचे म्हणणे आहे की, सध्या चित्रपटाच्या कथेचे काम वेगाने सुरू आहे. चित्रपटाची कास्ट आणि कथेबाबत दिया सध्या गप्प आहे. ती स्वत: आपल्या चित्रपटात काम करणार की नाही, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. अभिनयात करिअर डोलू लागताच दियाने आपले प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आणि प्रोडयूसर म्हणून लव ब्रेकअप्स जिंदगी आणि नंतर विद्या बालनला घेऊन बॉबी जासूस चित्रपट केले. परंतु बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपट अपयशी ठरले.बॉलिवूडचा इतिहास राहिला आहे की, दिग्दर्शनात खूप जास्त अभिनेत्रींनी नशीब आजमावलेले नाही आणि ज्यांनी हिम्मत दाखविली आहे, त्यांनाही जास्त चांगले परिणाम मिळालेले नाही. जुन्या काळात अशा काही अभिनेत्री होत्या, ज्यांनी ही हिम्मत केली होती. नरगिस दत्तची आई जद्दनबाई स्वत: दिग्दर्शक होत्या. दिग्दर्शक म्हणून त्यांनी पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, ज्यामध्ये पहिला चित्रपट तलाशे-हक होता, ज्यात त्यांनी बाल कलाकार म्हणून नरगिसला पडद्यावर आणले होते. या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी मॅडम फॅशन, हृदय मंथन, मोती का हार आणि जीवन सपना चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नूतन आणि तनूजा यांची आई शोभना सर्मथ यांनीदेखील दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवला. १९५0मध्ये तयार झालेल्या हमारी बेटीचे दिग्दर्शन त्यांनी केले आणि यामध्ये नूतनला अभिनेत्री म्हणून सादर केले होते.चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातील या धुरंधर अभिनेत्रींनंतर जवळजवळ चार दशकांपर्यंत कोणत्याही मोठय़ा अभिनेत्रीने दिग्दर्शनाच्या मैदानात येण्याची हिंमत केली नाही. ९0मध्ये हेमा मालिनीने दिल आशना है चित्रपटापासून दिग्दर्शनाची जबाबदारी संभाळली, मात्र यात यश मिळाले नाही.आपली मुलगी ईशा देओलसाठी हेमा मालिनीने टेल मी ओ खुदाचे दिग्दर्शन केले, मात्र येथेही मामला गडबडला. ऑफ बीट चित्रपटांची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदिता दासनेदेखील दिग्दर्शनात पाय ठेवला आणि २00८मध्ये गुजरात दंगलीवर आधारीत फिराकचे दिग्दर्शन केले, मात्र याला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले नाही. महेश भट्ट यांची मुलगी पूजाने अभिनयातील नवृत्तीनंतर जिस्म २ पासून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाय ठेवला. दिग्दर्शक म्हणून पूजाला अजूनही पहिल्या हिट चित्रपटाची प्रतीक्षा आहे. बॉलिवूडच्या बाहेर जाऊन पाहिले तर अभिनयातून दिग्दर्शनात आलेल्या अभिनेत्रींमध्ये अपर्णा सेन (कोंकणा सेन-शर्माची आई ) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रेवतीचे नाव पुढे येते. अपर्णा सेन यांनी कोंकणासोबत मि. अँण्ड मिसेज अय्यैर आणि रेवतीने सलमान खान, अभिषेक बच्चन आणि शिल्पा शेट्टीसोबत फिर मिलेंगेचे दिग्दर्शन केले होते. आता सुष्मिता सेन आणि लारा दत्ता व्यतिरिक्त मनीषा कोईरालादेखील दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवण्याचा विचार करीत असल्याची चर्चा आहे.