भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. त्या आता घरी परतल्या आहेत. स्वत: त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यांनी चाहत्यांचे आभार मानून सर्वांना त्या सुखरूप असल्याचे कळवले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचे दिसतेय.
लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते. रविवारी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून यांची माहिती दिली.
‘नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. मी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभार आहे. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावा,’ असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.