बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. दिव्याचा आज वाढदिवस आहे. तिच्या कुटुंबियातील कोणाचाच या क्षेत्राशी संबंध नव्हता. पण खूपच कमी वयात तिने अभिनयक्षेत्रात प्रवास केला. तिने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
1992 साली ‘विश्वात्मा’ या सिनेमातून तिने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील ‘सात समंदर पार मैं...’ या गाण्याने दिव्याला एका रात्रीत स्टार केले. हे गाणे हिट होताच दिव्याला 10 सिनेमे मिळाले. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये दिव्याने 12 सिनेमे केलेत आणि एकदिवस अचानक सगळ्यांना धक्का देत या जगातून कायमची निघून गेली.
शाहरुख खान आणि दिव्या भारतीची जोडी आपल्याला दिवाना, दिल आशना यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली होती. ही जोडी पुन्हा एकदा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात झळकावी अशी इच्छा आदित्य चोप्रा यांची होती. पण दिव्याच्या आकस्मिक निधनाने काजोलची या चित्रपटात वर्णी लागली.
तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले.
दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. सकाळपर्यंत दिव्याच्या निधनाचे वृत्त सिनेइंडस्ट्रीत पसरलं. दोन दिवसानंतर दिव्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उभे ठाकले होते.