दिव्या भारती (Divya Bharti ) हे नाव बॉलिवूडच्या इतिहासात कोरलं गेलं आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने जगाचा निरोप घेतला. परंतु, या कमी जीवनप्रवासातही तिने बॉलिवूडमध्ये तिचं नाव अजरामर केलं. आपल्या सौंदर्यामुळे अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या दिव्या भारतीच्या निधनाविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. तिच्या मृत्यूशी निगडीत अनेक अफवादेखील पसरल्या. परंतु, तिचं निधन नेमकं कसं झालं याचं कोडं अद्यापही उलगडलेलं नाही. आताश: दिव्या भारती आठवण्याचं कारण काय तर तिचा एक व्हायरल व्हिडीओ. होय, दिव्या भारतीच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ आहे १९९२ सालचा. गीत या सिनेमाच्या सेटवर दिव्याने एक मुलाखत दिली होती. पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा तिने या मुलाखतीत सांगितला आहे. एका फॅन पेजने तिचा हा व्हिडीओ शेअर केलाय आणि तोच सध्या व्हायरल होतोय. व्हिडीओत दिव्या तिच्या पहिल्या ऑटोग्राफबद्दल बोलतेय. ती म्हणते, होय, तो वाईट क्षण मला चांगल्याप्रकारे आठवतो. मी ऑटोग्राफ दिला आणि माझी आई मला म्हणाली, अरे पहिला ऑटोग्राफ आहे तुझा, त्या मुलीचं नाव तर विचार. ती शाळेत जाणारी मुलगी होती. माझ्यापेक्षाही लहान होती. मी १४ ची होती तर ती कदाचित १० वर्षांची असावी. मी लगेच तिला म्हणाले, अरे इकडे ये, इकडे ये... तुझं नाव काय... तिने फक्त वळून माझ्याकडे बघितलं आणि मग डोळे नाचवत निघून गेली. कचरा हो गया मेरा खडे खडे...
दिव्याचा हा व्हिडीओ बघून चाहते भावुक झाले आहेत. दिव्या आज जिवंत असती तर खूप मोठी स्टार असती, अशा भावना चाहते व्यक्त करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या भारतीचा मृत्यू हा एक अपघात होता. ५ एप्रिल १९९३ मध्ये मुंबईतील वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळून दिव्याचा मृत्यू झाला होता. रात्री ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली होती. दिव्याचा अपघात झाल्यानंतर तिला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान तिचं निधन झालं होतं.