प्राजक्ता चिटणीस
विनोदी, गंभीर अशा विविधांगी भूमिका लीलया साकारणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. ‘दे धक्का’,‘हुप्पा हुय्या’अशा अनेक मराठी चित्रपट, नाटकांमध्ये त्याने आपला वेगळेपणा सिद्ध केला. ‘स्वत:मधील क्वालिटी ओळखा, स्वत:ला प्रभावित करा,’ असे मत सिद्धार्थ जाधव यांनी मांडले. ‘सिम्बा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सिद्धार्थने लोकमतसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. यादरम्यान त्याने त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास, त्याचा दृष्टीकोन, इंडस्ट्रीतील बदल यासर्व बाबींवर प्रकाश टाकला. * तुझी स्टाईल खूप बदलली आहे. या बदलाकडे तू कसे पाहतोस?- खरंय. मी स्टाईल बदललीय. पण हा बदल गरजेचा होता. मला असं वाटतं की, हा बदल आपण काळाच्या ओघात केलाच पाहिजे. त्यामुळे दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास वाढतो. आपणही फॅशन, स्टाईल यांच्याबाबतीत अपग्रेड होतो. ‘सिम्बा’च्या निमित्ताने मी कलाकार म्हणून खूप अपग्रेड झालो, हे सांगायला काहीच हरकत नाही.
* आता तू ‘सिम्बा’च्या निमित्ताने बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत आहेस. काय सांगशील आत्तापर्यंतच्या स्ट्रगलविषयी?- मी ९९ पासून व्यावसायिक करिअरला सुरूवात केली. १७-१८ वर्षांचा काळ लोटला. मी मराठीतून काम केले, स्ट्रगल केले, मेहनत केली आता कुठे मला त्याचे फळ मिळतेय, असे वाटते. मग मी लूक्सवर पण काम केले. स्वत:मध्ये बदल घडवत गेलो. आत्तापर्यंतचा प्रवास मला बरंच काही शिकवणारा होता. आयुष्यात अनेक उतार-चढाव होते. त्यातूनच एक माणूस म्हणून मी खूप काही शिकलो.
* अभिनयापेक्षा लूक्सना जास्त महत्त्व असते का?- नाही. खरंतर अभिनय आणि लूक्स या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत एखादा कलाकार या दोन्ही गुणांनी समृद्ध होत नाही तोपर्यंत तो एक कलाकार म्हणून घडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वत:मधल्या क्वालिटी शोधा, स्वत:ला प्रभावित करा. स्वत:कडे बघण्याचा चष्मा बदला म्हणजे तुमचा दृष्टीकोन बदलेल.
* आत्तापर्यंतच्या प्रवासात तुझ्यासोबत कायम कोण होतं?- अर्थात माझं कुटुंब. कारण जेव्हा एखादा कलाकार स्ट्रगल करत असतो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचाही संघर्ष सुरू होतो. मला कायम माझ्या कुटुंबाने पाठिंबा दिला. त्यामुळे माझे कुटुंब हीच खरी माझी ताकद आहे, असे मी म्हणेन.
* तू एवढे वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करतो आहेस. मग बॉलिवूडमध्ये काम करत असताना कधी दडपण जाणवलं का?- नाही, कधीच नाही. कारण मी जसा आहे तसाच राहण्यावर जास्त लक्षकेंद्रित करतो. कुणा दुसऱ्यासाठी मी स्वत:मध्ये बदल करत नाही. मला एकदा महेश मांजरेकरांनी सांगितले होते की, कोणत्याही कलाकाराने कॅमेऱ्यात अडकून राहू नये. त्याने एक अभिनेता म्हणून काम करावं, बरोबर तो कॅमेरा त्याला कैद करतोच. कॅमेऱ्याला तुमच्यामागे येऊ द्या, तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे धावू नका, हाच एकमेव मंत्र घेऊन मी आजवर अनेक उत्कृष्ट भूमिका साकारतो आहे.