‘वलय’ नव्हे समाधान हवे - वैभव तत्त्ववादी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 1:10 PM
मराठी सिनेमासृष्टीतून थेट बॉलिवूड वारी केलेले बरेचसे असे कलाकार आहेत, जे बॉलिवूडच्या वलयात असे काही हरवून जातात की जणू काही त्यांचा कधी काळी मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधच नव्हता.
सतीश डोंगरेमराठी सिनेमासृष्टीतून थेट बॉलिवूड वारी केलेले बरेचसे असे कलाकार आहेत, जे बॉलिवूडच्या वलयात असे काही हरवून जातात की जणू काही त्यांचा कधी काळी मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधच नव्हता. मात्र यास काही कलाकार अपवाद आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता वैभव तत्त्ववादी हे होय. वैभवच्या आगामी प्रकाश झा दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमानिमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने वलयापेक्षा कामाचे समाधान मला अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचे सांगितले. यावेळी वैभवने इंडस्ट्रीशी संबंधित अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या, त्याचाच हा आढावा...प्रश्न : २०१५ पासून ‘हंटर’ या सिनेमातून तुझ्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. मात्र मराठीमधील तुझी वाटचालही कौतुकास्पद राहिली आहे. तुला या दोन पैकी कोणती इंडस्ट्री आव्हानात्मक वाटली?- खरं तर भाषेवरून इंडस्ट्रीमधील आव्हानाचे मोजमाप करणे अवघड आहे. दोन्हीकडे ‘कष्ट’ हा समांतर धागा आहे. स्क्रिप्ट चांगली असेल अन् त्यात तुम्ही दमदार अभिनय करत नसाल तर त्या स्क्रिप्टला फारसे महत्त्व राहत नाही. मराठी असो वा हिंदी अथवा साउथ सगळीकडेच तुम्हाला कामाप्रती प्रामाणिकता ठेवावी लागते. मराठी इंडस्ट्रीमध्ये मी दिलेल्या योगदानात प्रामाणिकपणा आहे. कदाचित त्याच कामाची पावती म्हणून मला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली, असे मी समजतो. प्रश्न : बºयाचदा मराठी इंडस्ट्रीमधील कलाकाराला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली की तो बॉलिवूडच्या वलयात हरवून जातो, याविषयी काय सांगशील?- इतरांविषयीचे मला माहीत नाही, परंतु मी कधीही या वलयात हरवून गेलो नाही. कारण वलयापासून दूर राहत मी केवळ कामाला प्राधान्य दिले आहे. शिवाय मला मराठी इंडस्ट्रीविषयीचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही. आगामी काळात मी बºयाचशा मराठी सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. त्याचबरोबर टीव्हीवरदेखील एका मालिकेत मी काम करणार आहे. त्यामुळे मी वलयापासून दूर राहिलो हे मला आवर्जून सांगावेसे वाटेल. प्रश्न : हिंदी-मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तू काम करीत आहेस? तुला कोणत्या स्टार्ससोबत काम करण्याचे तुझे ड्रिम आहे?- हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीमधील बरेचसे असे लिजेंड स्टार्स आहेत ज्यांच्यासोबत मला काम करण्याची माझी इच्छा आहे. तत्पूर्वी त्यांच्या कामाचे निरीक्षण करायला मला आवडेल. अभिनेते विक्रम गोखले यांच्या नाटकाच्या तालीम बघायला अन् त्यातून काही शिकण्याची मला संधी मिळाल्यास नक्कीच मी त्यासाठी पुरेसा वेळ देईल. आमच्या पिढीला काशीनाथ घाणेकर या दमदार कलाकाराचा अभिनय बघता आला नसल्याचेही मला नेहमीच खंत वाटते. हिंदी सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक कलाकाराचे जे स्वप्न आहे तेच माझेही आहे. मला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचे आहे.प्रश्न : ‘बाजीराव मस्तानी’पासून रणवीर सिंग आणि तुझ्यात चांगली मैत्री निर्माण झाली आहे. तुमच्या या मैत्रीबद्दल काय सांगशील?- रणवीर सिंग हे एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व आहे. तो प्रत्येकासोबतच आपुलकीने वागतो. ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मला हे पावलोपावली जाणवले. तो कधीच इतरांना दुखवित नाही. उलट त्याच्याशी आपुलकीने वागत असल्याने प्रत्येकाला त्याचा हा स्वभाव भावतो. मलाही रणवीरचा स्वभाव भावला आहे. प्रश्न : ‘कॉफी विथ बरच काही’ या सिनेमाचा सिक्वल येत असल्याची चर्चा आहे? - होय, परंतु यास अजून बराचसा कालावधी आहे. कारण सिनेमाच्या स्टारकास्टपासून ते स्क्रिप्टपर्यंतचे सर्वच काम अजून पूर्णत्वास येणे आहे. मात्र सिनेमाच्या सिक्वलवर काम केले जात आहे, हे नक्की. त्याचबरोबर महेश मांजरेकर, चंद्रकांत कणसे यांच्याबरोबरही मी सिनेमे करत आहे. प्रश्न : हिंदी असो वा मराठी स्टार्सला छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे, आगामी काळात तुला प्रेक्षक छोट्या पडद्यावर बघू शकतील का?- माझ्या मते कुठल्याही कलाकारासाठी छोटा पडदा अर्थात टीव्ही हे त्यांच्यातील टॅलेंट सिद्ध करण्याचे जबरदस्त माध्यम आहे. मला छोट्या पडद्याविषयी नेहमीच आकर्षण राहिले आहे. आगामी काळात मी ‘झी युवा’वरील ‘प्रेम’ या मालिकेत तेजस्विनी प्रधानबरोबर एक लव्हस्टोरी करत आहे. प्रश्न : ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाविषयी काय सांगशील?- प्रकाश झा दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाच्या टायटलवरूनच त्याची कथा अधोरेखित होते. सिनेमात माझ्यासोबत अभिनेत्री कोंकणा सेन हिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा ज्वलंत विषयावर असून, प्रेक्षकांना तो आवडेल अशी अपेक्षा आहे.