Don’t worry fans! ! दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 5:30 AM
सुपरस्टार दिलीप कुमार यांची प्रकृती काल अचानक बिघडली आणि त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल केले गेले. साहजिकच ही बातमी ...
सुपरस्टार दिलीप कुमार यांची प्रकृती काल अचानक बिघडली आणि त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल केले गेले. साहजिकच ही बातमी ऐकून त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण आजची सकाळ त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी चांगली बातमी घेऊन उगवली आहे. होय, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी आज सकाळी ही माहिती दिली. दिलीप कुमार यांना डिहायड्रेशनमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तथापि पुढील दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात येईल, असे रूग्णालयाने म्हटले आहे.९४ वर्षांचे दिलीप कुमार यांना किडनीचा त्रास जाणवू लागल्यानेच आयसीयूमध्ये दाखल केले गेले होते. काल दुपारी त्यांना किडनीचा त्रास जाणवू लागला. गत काही दिवसांपासून त्यांना सातत्याने प्रकृतीचा त्रास जाणवत असून, श्वसनाच्या समस्येने ते त्रस्त आहेत. गतवर्षी डिसेंबर महिन्यातही त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘मधुमती’, ‘मुघल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’ आणि ‘कर्मा’अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर त्यांचा नवा शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले फोटो शेअर केले होता. सायरा बानो यांच्या माध्यमातून दिलीपकुमार या वयातही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. तब्बल सहा दशक त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.