जरीवाला कुटुंबातील कोणताही पुरुष पन्नाशीनंतर जगत नाही असे संजीव कुमार नेहमीच सगळ्यांना सांगत. त्यांच्या दोन्ही भावांचा मृत्यू चाळीशीत झाला होता. त्यांनीदेखील वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दारुच्या, सिगारेटच्या व्यसनाचा संजीव कुमार यांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होत होता. त्यांना वयाच्या 45व्या वर्षी पहिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी त्यांची ही लाईफस्टाईल बदलावी असा डॉक्टरांनी सल्लाही दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना काहीच महिन्यात अजून दोन हृदयविकाराचे झटके आले. त्यानंतर ते अमेरिकेला उपचारासाठीदेखील गेले. पण काही ऑपरेशन्स करून मुंबईत परतल्यावरही त्यांची तब्येत सुधारली नाही. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळतच होती. ते अतिशय बारीक झाले होते तसेच त्यांना धड दोन पावलेही चालता येत नव्हते.
संजीव कुमार यांचा मृत्यू त्यांच्या घरातच झाला. यावेळी सचिन पिळगांवकर त्यांच्या घरात होते. त्यांनीच ही दुखद बातमी बॉलिवुडच्या लोकांना दिली. संजीव कुमार यांची लोकप्रियता खूपच कमी वेळात शिगेला पोहोचलेली होती. त्यांच्या मृत्युची बातमी कळताच लोकांची रीघ लागली. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक कित्येक तास रांगेत उभे होते. अंतिम दर्शनाची रांग जवळजवळ तीन दिवस होती. तिसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. संजीव कुमारबाबत तुम्हाला हे माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2016 7:56 AM
संजीव कुमार यांची कारकिर्द ही केवळ काही वर्षांची असली तरी बॉलिवुडमधील महान अभिनेत्यांपैकी त्यांना एक मानले जाते. त्यांनी आंधी, ...
संजीव कुमार यांची कारकिर्द ही केवळ काही वर्षांची असली तरी बॉलिवुडमधील महान अभिनेत्यांपैकी त्यांना एक मानले जाते. त्यांनी आंधी, खिलोना, मौसम, कोशिश, शोले, पती पत्नी और वो, अंगुर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सरस भूमिका साकारल्या. त्यांचा मृत्यू 6 नोव्हेंबर 1985ला वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी झाला. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टींवर एक नजर टाकूया..संजीव कुमार यांचे खरे नाव हरिभाई जेठालाल जरीवाला. त्यांचा जन्म सुरतमध्ये झाला. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या जन्माच्या काही वर्षांनंतर मुंबईत स्थायिक झाले. अभिनयाची आवड असल्याने मुंबईत आल्यावर त्यांनी अभिनय शिकण्यासाठी निर्माते एस.मुखर्जी यांच्या फिल्मालय या अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. एस. मुखर्जी यांच्या हम हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे संजीव कुमार यांनी बॉलिवुडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात एस.मुखर्जी यांचा मुलगा जॉय मुखर्जी प्रमुख भूमिकेत होता. संजीव कुमार यांची या चित्रपटातील भूमिका खूपच छोटी असून त्यांना या चित्रपटात एकही संवाद नव्हता. संजीव कुमार यांनी रंगभूमीवरून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले. आंधी, शोले, त्रिशुल यांसारख्या अनेक चित्रपटात संजीव कुमार यांनी त्यांच्या वयापेक्षा कित्येक जास्त वयाच्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती. निशान या चित्रपटात संजीव कुमार यांनी पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात प्रेम चोपडा, हेलन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. खिलोना या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने बॉलिवुडचे त्यांच्याकडे लक्ष गेले. संजीव कुमार मुंबईत आल्यानंतर गिरगाव येथील एका चाळीत राहात होते. त्यानंतर त्यांनी पाली हिलमध्ये फ्लॅट घेतला. दिलीप कुमार, सायरा बानू, सुनील दत्त, नर्गिस हे नंतरच्या काळात त्यांचे शेजारी होते. संजीव कुमार यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करण्यात आले. त्यांना फिल्मफेअरकडून 14 वेळा नामांकन मिळाले होते. त्यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर एकदा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना आंधी, अर्जुन पंडित आणि शिकार या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले होते. संजीव कुमार यांना मर्सडिज गाडी, दारू आणि मांसाहारी जेवण यांचे प्रचंड वेड होते. दारू आणि सिगारेटशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. संंध्याकाळच्या वेळात त्यांना अनेकवेळा वांद्रे येथील लिंकिग रोडवरील धाब्यांवर पाहाण्यात येत असे. नूतनसोबत काम करताना संजीव कुमार त्यांच्या प्रेमात पडले होते. नुतन यांना त्यांनी लग्नाची मागणीही घातली होती. त्यावेळी नुतन यांचे आधीच लग्न झालेले होते. नूतन यांनी चिडून चारचौघांमध्ये त्यांच्या कानाखाली लगावली होती. संजीव कुमार यांनी शोले, सीता और गीता यांसारख्या चित्रपटात हेमा मालिनी यांच्यासोबत काम केले होते. संजीव हे हेमा मालिनी प्रेमात आकंठ बुडाले होते. पण त्यांच्या दारुच्या व्यसनामुळे हेमा मालिनीच्या आईने या नात्याला विरोध केला. संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या नात्याचीही खूप चर्चा होती. सुलक्षणा यांनी संजीव कुमार यांच्या मृत्यूनंतर लग्न न करण्यााचा निर्णय घेतला. त्या आजन्म अविवाहित राहिल्या. संजीव कुमार हे नेहमीच चित्रीकरणाला उशिराने येत असत. पण आल्यानंतर काहीच तासांत ते चित्रीकरण पूर्ण करत असत. संध्याकाळचा वेळ ते त्यांच्या मित्रांना देत. पांढरा कुर्ता, पांढरा पायजमा आणि पांढरी चप्पल हा संजीव कुमार यांचा आवडता पेहराव होता.