हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना आपल्या तालावर थिरकायला लावणारा प्रसिद्ध कोरियोग्राफर अर्थात नृत्य दिग्दर्शक म्हणजे गणेश आचार्य. घरातूनच त्याला नृत्यदिग्दर्शनाचा वारसा मिळालाय. त्याचे वडील कृष्ण गोपी हेदेखील कोरिओग्राफर म्हणून प्रसिद्ध होते. बहीण कमलकडून त्याने नृत्याचे धडे गिरवले. अवघ्या १९ व्या वर्षी कोरियोग्राफर म्हणून त्याने कामाला सुरूवात केली.
१९९२ साली आलेल्या 'अनाम' चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम करण्याची त्याला संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गणेश आचार्यप्रमाणे त्याच्या पत्नीनेही बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव विधी आचार्य असं आहे. तिने दिग्दर्शिका म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
'हे ब्रो' या चित्रपटाचे तिने दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात गणेश आचार्यने भूमिका साकारली होती. विधी आणि गणेश यांना सौंदर्या नावाची मुलगी आहे. गणेश आचार्यने बॉलीवूडच्या गाजलेल्या गाण्यांसाठी कोरियोग्राफी केली आहे.'लज्जा' चित्रपटातील बडी मुश्किल है… या गाण्यावर धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मनीषा कोईराला यांना थिरकवलं.
याशिवाय 'बीडी जलयले', 'रंग दे बसंती', 'ऐसा जादू डाला रे' सारख्या हिट गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन गणेशने केले आहे. 'ABCD' या चित्रपटात त्याने अभिनयाचा जलवाही दाखवला. स्वप्नील जोशी, रुची इनामदार यांची भूमिका असलेल्या 'भिकारी' चित्रपटाचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटसृष्टीतही गणेशने यशस्वी पाऊल ठेवलंय.