Join us

जॉनी वॉकर यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 11:03 AM

प्यासा या चित्रपटातील सर जो तेरा चकराये... हे जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत झालेले गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ...

प्यासा या चित्रपटातील सर जो तेरा चकराये... हे जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत झालेले गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आजही ते गाणे रसिकांच्या स्मरणात आहे. मधुमती, शिकार, आनंद, चुपके चुपके यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आज जॉनी वॉकर यांना जाऊन 13वर्षं झाले. आज बदरूद्दीन काझीचा स्मृतीदिन. 15 मे 1923ला इंदोरमध्ये जन्मलेला हा एक गिरणीकामगाराचा मुलगा. गिरणी बंद पडून वडिलांची नोकरी गेल्यावर 15 जणांचं कुटुंब पोसणं कठिण झालं. कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडल्यावर हे कुटुंब मुंबईला आलं. या शहराने आजपर्यंत किती जणाचं नशीब उजळवलंय याची गणती नाही. आपलेही नशीब हे शहर बदलवेल अशी त्यांना आशा होती. त्यामुळे हे कुटुंब मुंबईतच स्थायिक झाले. त्या कुटुंबातील एक मुलगा बस कंडक्टर म्हणून कामही करू लागला होता. दादर डेपोत बस कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या आणि बसमधील प्रवाशांची आपल्या लीलांनी करमणूक करणाऱ्या बदरूद्दीनला बलराज सहानींनी हेरला. त्याला त्यांनी देव आनंद आणि गुरुदत्तसमोर नेऊन उभा केला आणि त्याने गुरूदत्त आणि देवानंदच्या 1951 साली प्रदर्शित झालेल्या 'बाझी'मध्ये त्याच्याच नावाची भूमिका साकारली. कालांतराने गुरूदत्तने त्याचे 'जॉनी वॉकर' असं अत्यंत चपखल नामकरण केलं. त्यानंतर आलेल्या बहुतेक सर्व सिनेमांमध्ये अट्टल दारूड्याच्या भूमिका बदरूद्दीनने इतक्या अस्सलपणे केल्या की, हा दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही यावर विश्वास ठेवणं जड जावं. सुमारे ३०० सिनेमे..  त्यातील काही हिरो म्हणूनही. एकात तर हिरो जॉनी वॉकर आणि राजेंद्रकुमार सहाय्यक अभिनेता होता. मधुमती आणि शिकार यामधील भूमिकांसाठी त्याला सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या पडद्यावरील गुणी दारूड्याने आनंदमध्ये दारू न पिणाऱ्या मुरारीलालची चटका लावणारी अजरामर भूमिका अभिनित करून आपल्या अभिनयकौशल्याची चुणूक दाखवली. आपल्या माकडचेष्टांनी  पिटातल्या प्रेक्षकांमध्ये कमालीचा लोकप्रिय झालेल्या मेहमूदच्या लाटेपुढे जॉनी टिकाव धरू शकला नाही.1986 मध्ये आपल्या मुलाला सिनेसृृष्टीत आणण्यासाठी निर्माता बनलेल्या जॉनीचं नशीब त्या सिनेमाबरोबरच आपटलं. जॉनी यांनी 1998 साली प्रदर्शित झालेल्या चाची 420 मध्ये आपल्या कारकिर्दीतील शेवटची भूमिका साकारली. 2003 साली बरोबर आजच्या दिवशी त्यांचे निधन झाले. तमाम पिअक्कडांच्या या स्फूर्तिदात्याला भावपूर्ण आदरांजली. त्याच्या कारकिर्दीवर कोणा जाणकाराने लिहिलेला हा लेख...नवीनच सुरु झालेल्या 'नवकेतन'च्या ऑफिसमध्ये देव आनंद, चेतन आनंद, गुरुदत्त आणि बलराज साहनी बसले असताना एक दारुडा आत घुसला आणि बडबड करायला लागला. त्याला कपड्याची शुद्ध नव्हती की धड पायावर उभं राहता येत नव्हतं. थोडावेळ सर्वांची करमणूक झाली नंतर त्याला बाहेर हकलवायची वेळ झाली, तेव्हा बलराज साहनी त्या दारुडयाला म्हणाले 'बस हुआ बदरी, साहब लोगों को सलाम करो'. बेवडा क्षणात नॉर्मल झाला, जणू काही झालंच नव्हतं.आनंद बंधू, गुरुदत्त आवाक झाले. हा माणूस दारु न पिता प्यायल्याची अँक्टिंग करतोय यावर त्यांचा विश्वासच बसेना. चेतन आनंदनी तर लगेचच उठून चक्क त्याच्या तोंडाचा वास घेतला. माहिमला बलराज साहनींची बाइक अडवून बदरीने त्यांना वारंवार घातलेली गळ कामाला आली. बलराजने योजलेली चाल कमालीची यशस्वी झाली. आइसफ्रूट विकणारा, बस कंडक्टर आणि पिक्चर मध्ये 'एक्स्ट्रा' म्हणून काम करणारा बदरुद्दीन काझी 'जॉनी वॉकर' झाला. दारुच्या थेंबालाही कधी स्पर्श न करता पडद्यावरील आद्य बेवडा म्हणून सुप्रसिद्ध झाला. एक नाव आणि चेहरा नसलेला, दिवसाला तीन रुपये मिळवणारा नगण्य माणूस प्रेक्षकांच्या गळयातील ताईत बनला.तेव्हा असं म्हणत की, जॉनी वॉकर नसला तर सेन्सॉर पिक्चर पास करेल का नाही असं निर्मांत्याना वाटे. जॉनीचं नुसतं दर्शन झाले की, थिएटरमध्ये हसू फुटत असे. पिचलेल्या आवाजातील चिरकल्यागत बोलणं पब्लिकला जाम आवडायचं. 'आदमी हलका हैं बोजा भारी हैं, सडक जरा इधर लाव ना' (नया दौर) हा संवाद त्याने अशा काही टायमिंगने टाकलाय आणि तेव्हा डोक्यावर घमेलं, कंबर ढिली आणि लटपटणारे पाय हा अवतार इतका मस्त साधला होता की, प्रेक्षक हसून हसून थिएटर डोक्यावर घेत असत. 'ये साब नया हैं क्या?' हा प्रश्न भुरटा चोर झालेल्या जॉनी वॉकरनेच इन्स्पेक्टर देव आनंदला विचारावा. 'न मुर्गीमे दिल लगता हैं न अंडेमे' (घर बसाके देखो) ही मनाची झालेली अवस्था दाखवतांना जॉनीचा थाट बघण्यासारखा होता. 'डार्लिंग सफेद वर्दीमें तेरा काला रंग क्या खुल रहा हैं' असले अफलातून संवाद जॉनीनेच म्हणावेत.'आखरी पैगाम' हा बदरीचा पहिला पिक्चर पण तो 'जॉनी वॉकर' झाला 'बाजी'मध्ये. त्यानंतर गुरुदत्तच्या प्रत्येक पिक्चरमध्ये तो होता. विनोदी नटांनी आधीदेखील पडद्यावर गाणी गायली होती, पण विनोदी नटाला गाणं हवंच हा पायंडा मात्र जॉनीनी पाडला. गाण्याच्या मधेमधे बोलणं ही तर जॉनीची खासियत. 'चाहे कोई खुश हो' (टॅक्सी ड्रायव्हर), 'सर जो तेरा चकराये'(प्यासा) यासारख्या कितीतरी गाण्यातुन जॉनी 'पचकलाय' ते अतिशय लोकप्रिय झालं होतं.रुपाशी संबध नसताना आणि अभिनयावर विनोदवीर हा शिक्का बसलेला असताना पण जॉनी हिरो झाला. त्याची लोकप्रियता इतकी अफाट होती की, हिरोच्या सर्व कसोट्या गळून पडल्या. बहुतेक पिक्चरमध्ये श्यामा त्याची हिरोइन असे. जॉनी वॉकर एक्स्ट्राचा हिरो झाला आणि एक्स्ट्राची हिरॉइन झालेल्या श्यामाबरोबर त्याची जोडी जमली. हा योगायोगही विलक्षणच. 'दुनिया रंग रंगिली'त जॉनी नायक तर राजेंद्र कुमार सहनायक होता. 'छू मंतर, खोटा पैसा, नया पैसा, मिस्टर जॉन, रिक्षावाला, जॉनी वॉकर, मिस्टर कार्टून एम. ए.' आदी पिक्चरचा जॉनी हिरो होता. 'आनंद' मध्ये जॉनीने आपण रडवूही शकतो हे दाखवून दिले. त्याच्या नावाचा चित्रपट निघतो ही एकच गोष्ट त्याच्या अफाट लोकप्रियतेची साक्ष द्यायला पुरेशी आहे.