कलाविश्वात आजवर असे अनेक कलाकार पाहायला मिळतात जे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे सख्खे भावंड आहेत. करीना कपूर- करिश्मा कपूर, सनी देओल- बॉबी देओल अशा कितीतरी बहीण-भावांच्या जोड्या कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर दोन अभिनेत्यांच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. हे दोन्ही अभिनेते बॉलिवूडमध्ये भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. या जोडीतील एकाच्या नावाची तर सध्या देशभरात चर्चा आहे.
सोशल मीडियावर सध्या भावांच्या जोडीचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये पाहिल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्यांना ओळखणंदेखील कठीण आहे. या फोटोमध्ये दिसणारे हे चिमुकले दुसरे-तिसरे कोणी नसून अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सनी कौशल (Sunny Kaushal) आहेत. विकी कौशल आणि सनी कौशल हे अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचे मुले आहेत. विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ रोजी मुंबईत झाला. तर सनी कौशलचा जन्म २८ सप्टेंबर १९८९ रोजी झाला होता. विकी मोठा तर सनी कौशल हा धाकटा आहे.
विकी आणि सनी या दोघांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. विकीनं 'मसान', 'राजी', 'संजू' आणि 'सरदार उधम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर सध्या देशभरात विकीच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या सिनेमातून विकीनं बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचले आहेत. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे. सनीनं 'सन शाईन म्युझिक टुर्स अँड ट्रव्हल्स' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. शिद्दत, चोर निकल के भागा, फिर आयी हसीन दिलरुबा असे हीट चित्रपट त्याने दिलेत. दोन्ही भावांना एकत्र एका सिनेमातत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.