शाहिद कपूरचा भाऊ करणार का दीपिका पदुकोणसोबत डेब्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 4:22 PM
इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत तुम्ही स्टार पुत्रांचे पदार्पण ऐकले असेल; परंतु आता स्टार बंधुचे आगमन होणार आहे. चॉकेलट बॉय म्हणून प्रसिद्ध ...
इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत तुम्ही स्टार पुत्रांचे पदार्पण ऐकले असेल; परंतु आता स्टार बंधुचे आगमन होणार आहे. चॉकेलट बॉय म्हणून प्रसिद्ध झालेल्या शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. पण तो काही मुख्य हीरो अथवा बिग बजेट सिनेमात काम करत नाही तर एका हटके पद्धतीने मोठ्या पडद्यावर झळणार आहे.इशान हा नीलिमा आझिम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. गेली अनेक वर्षे त्याच्या पदार्पणाच्या बातम्या येत होत्या. मध्यंतरी तो सैफ अली खानची मुलगी सारासोबत डेब्यू करणार असल्याचीदेखील चर्चा होती. परंतु आता अशी माहिती मिळतेय की, स्वत:च्या टॅलेंटच्या जोरावर त्याने माजिद माजिदीसारख्या प्रख्यात दिग्दर्शकाच्या सिनेमात काम मिळवले आहे.तुम्हाला तर आठवतच असेल की, नोव्हेंबर महिन्यात दीपिका पदुकोणने प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या ‘फ्लोटिंग गार्डन्स’ नावाच्या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिली होती. त्यामध्ये ती मुंबईच्या धोबी घाटावर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीच्या रुपात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाचा भाऊ म्हणून इशानची वर्णी लागली असल्याचे कळतेय. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट तयार केला जाणार असून नंतर तो फारसी भाषेत डब केला जाणार आहे.चार वर्षांपूर्वी माजिदी यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. अखेर गेल्या वर्षी त्यांनी भारतात येऊन कलाकारांची निवड केली आणि मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि काश्मिर येथील लोकशन्सची पाहणीसुद्धा केली. या महिन्याच्या शेवटी शूटींग सुरू होणार असून कथेबाबत अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही.दीपिका सध्या संजय लीला भंन्साळी यांच्या ‘पद्मावती’ची शूटींग करीत असून यामध्ये शाहिद कपूर तिच्या पतीची भूमिका साकारत आहे.