बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला सनी देओलचा 'गदर 2' (gadar 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर धडकला. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये या सिनेमाने अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले आहेत. त्यामुळे हा सिनेमा सातत्याने चर्चेत येत आहे. अवघ्या १५ दिवसात ४३९ कोटींची कमाई करणारा हा सिनेमा एकीकडे हिट ठरतोय. तर, दुसरीकडे काही जण त्याला ट्रोलदेखील करत आहेत. हा सिनेमा पाकिस्तान विरोधी असल्याचं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. मात्र, आता या ट्रोलिंगवर सनी देओलने (sunny deol)त्याचं मौन सोडलं आहे.
अलिकडेच सनी देओलने बीबीसी युकेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने गदरला पाकविरोधी बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. इतकंच नाही तर हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी आहे. तो तसाच पाहा असंही त्याने सांगितलं.
"फाळणीपासून आमच्यात द्वेषाची भावना पसरली आहे. मात्र, जे घडलं ते घडून गेलं. परंतु,आता तो राजकीय मुद्दा झाला आहे. असं मला वाटतं. दोन्ही देशातील जनतेने ते सगळं विसरायचं आहे. एकंदरीत मला एवढंच सांगायचंय की, चित्रपटांना जास्त गांभीर्याने घेऊ नका. हा चित्रपट पाकिस्तान विरोधी नाहीये. सोशल मीडियावर सुरु असलेल्या वायफळ बडबडीकडे दुर्लक्ष करा. आणि, मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून सिनेमा पाहा", असं सनी देओल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "हा एक सिनेमा आहे. आणि, प्रत्येक सिनेमामध्ये एक नायक, एक खलनायक असतो. पण, मला नाही वाटत की मी या सिनेमामध्ये कुठेही कोणाची बदनामी केली आहे. तारा हे द्वेष पसरवणारं पात्र नाहीये. यापूर्वीही मी बॉर्डर सिनेमामध्ये जी व्यक्तिरेखा साकारली होती ती त्या काळातील लष्करी जवानांच्या वास्तविक जीवनातील युद्धानुभवावर आधारित होती. पण, लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि वैयक्तिक झाले."