संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान होताच कुटुंबासोबतच चाहतेही बाबाच्या काळजीने चिंतीत झाले होते. पण बाबाची इच्छाशक्ती जबरदस्त होती. मी कॅन्सरला हरवणारच, हा त्याचा इरादा पक्का होता. त्यानुसार, संजूबाबाने कॅन्सरवर मात केली. पण कॅन्सर झाला हे कळल्यावर संजयच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. संजयचे डॉक्टर जलील पार्कर यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले आहे.
जलील यांनी जागतिक कर्करोगाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, संजयला जेव्हा कर्करोग झालाय, हे त्याला कळले त्यावेळी देवा... हे माझ्याचसोबतच का असा पहिला शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडला होता. पण तरीही संजय डगमगला नाही. त्याने काही विदेशातील डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानंतर कोकीलाबेन रुग्णालयात किमोथेरपी सुरू करण्याचा निर्णय घेतला. खरे तर रुग्णाला कुठे उपचार घ्यायचे हा त्याचा सर्वस्वी निर्णय असतो. त्यामुळे आम्ही त्याच्यावर याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये संजय दत्तने ट्वीट करून त्याला कर्करोगाची लागण झाली असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. तसेच कर्करोगाच्या उपचारासाठी काही महिन्यांचा ब्रेक घेतोय. पण तुमच्या आशीर्वादामुळे मी लवकरच परतेन... असे देखील ट्वीट केले होते.
संजय दत्तला कर्करोग झाल्यापासून तो सोशल मीडियापासून दूर होता. पण ऑक्टोबरमध्ये त्यानेच ट्वीट करून कर्करोगावर मात केल्याचे फॅन्सना सांगितले होते. तसेच या कठीणसमयी त्याचे फॅन्स त्याच्यासोबत राहिले यासाठी त्याने फॅन्सचे आभार मानले होते.
कर्करोगावर मात केल्यानंतर संजयने चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात देखील केले आहे. केजीएफ २ या चित्रपटासाठी त्याने भुज आणि हैद्राबाद या ठिकाणी नुकतेच चित्रीकरण केले आहे.