डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त करत आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, मराठी अभिनेता सुबोध भावे, अमेय वाघ अशा अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तुम्ही होतात म्हणून मी घडले... अशी भावूक पोस्ट लिहित उर्मिलाने डॉ. लागूंसोबतचा फोटो शेअर केला. ‘एका सामान्य घरातल्या मुलीतील अभिनयक्षमता ओळखून तुम्ही मला रूपेरी पडद्यावर आणले. सामाजिक बांधिलकी तुमच्याकडूनच शिकले. कायम तुमच्या ऋणात असेल,’ अशी भावूक पोस्ट उर्मिलाने शेअर केली.
ऋषी कपूर यांनी श्रीराम यांच्यासोबत कधीही काम करण्याची संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ‘दुर्दैवाने गत 25-30 वर्षांत कधीही डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही...’, असे त्यांनी लिहिले.
मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अमेय वाघ यानेही भावूक पोस्ट लिहिली. तालमी आणि शूटींगदरम्यान या नटसम्राटाच्या सानिध्यात राहून जे अनुभवलं ते अद्भूत होतं..., असे लिहित त्याने एक व्हिडीओ शेअर केला.
तर सुबोध भावेने यानिमित्ताने कट्यार सिनेमाच्या आठवणी जागवल्या. कट्यार चित्रपटात मुहूर्त डॉक्टरांनी करावा अशी आमची इच्छा होती. त्यांनी मोठ्या मनाने ती स्वीकारली, असे लिहित त्याने या क्षणाचा एक फोटो शेअर केला.
डॉ. श्रीराम लागू यांना अभिनय कारकीदीर्तील ‘नटसम्राट’ हे नाटक, सिंहासन, पिंजरा यांसारखे मराठी सिनेमे मैलाचा दगड ठरले आहेत. डॉ.श्रीराम लागू यांनी सुमारे 4 दशके मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले. 100 हून अधिक हिंदी सिनेमात आणि 40 पेक्षा अधिक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. यासोबतीने 20 हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं आहे.