सध्या बॉलिवूडमध्ये सीक्वेलचा ट्रेंड आल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ओएमजी २’, ‘गदर २’ नंतर शुक्रवारी(२५ ऑगस्ट) आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा हा सीक्वेल आहे. आयुष्मान खुरानाच्या या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना लोटपोट हसवलं होतं. त्यामुळेच या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षक उत्सुक होते. ‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता ‘ड्रीम गर्ल’प्रमाणेच त्याचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
‘ड्रीम गर्ल २’ बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांना तगडी टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्लने प्रेक्षकांवर जादू केल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.६९ कोटींची कमाई केली आहे. चंदिगड करे आशिकी, अनेक, डॉक्टर जी आणि अक्शन हिरो असे लागोपाठ चार चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली आहे.
“तेव्हा ऐश्वर्या माझी सून नव्हती, पण...”, बिग बींनी सांगितला ‘कजरा रे’ गाण्याचा किस्सा
आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटानेही पहिल्या दिवशी १० कोटींच्या आसपास कमाई केली होती. पण, तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ‘ड्रीम गर्ल’ने बॉक्स ऑफिसवर एकूण १४२ कोटींचा गल्ला जमवला होता. आयुष्मान खुरानाच्या बॉलिवूड करिअरमधील हा सगळ्यात जास्त कमाई करणारा सुपरहिट चित्रपट ठरला होता.
आयुष्मान खुरानाबरोबरच ‘ड्रीम गर्ल २’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.