पूजा तुझा अभिनयप्रवास कसा सुरू झाला?
मी शाळेत असताना प्रचंड लाजाळू होते. त्यामुळे माझा हा स्वभाव कॉलेजला गेल्यावर बदलायचा असे मी ठरवले होते. त्यामुळे सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे. कॉलेजमधील एका स्पर्धेत मी भाग घेतला असताना त्या स्पर्धेसाठी आलेल्या परीक्षकाने मिस इंडिया या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला विचारले. मला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हा विचार मी कधीच केला नव्हता. पण काहीतरी क्रिएटिव्ह करायचे हे माझ्या सतत डोक्यात होते. त्यामुळे मी लगेचच स्पर्धेत भाग घेण्यासाठी होकार दिला. ही स्पर्धा मी जिंकू शकले नसले तरी या स्पर्धेचा मला खूपच फायदा झाला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक अभिनेत्री आम्हाला बॅक स्टेजला भेटायला आली होती. तिने आम्हाला सांगितलेली गोष्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. ती म्हणाली होती की, जिंकणे हरणे हे महत्त्वाचे नसते. या स्पर्धांमुळे तुम्हाला केवळ एक प्लॅटफाॅर्म मिळतो. भविष्यात तुम्हालाच स्वतःला सिद्ध करावे लागते. ही गोष्ट मी आजपर्यंत माझ्या डोक्यात ठेवली आहे. या स्पर्धेनंतर मी दाक्षिणात्य सिनेमात काम करायला सुरुवात केली.
मोहेंजोदडो हा चित्रपट तुला कसा मिळाला?
आशुतोष गोवारिकर यांच्या पत्नीने मला एका जाहिरातीत पाहिले होते. त्यांनीच माझे नाव आशू सरांना सुचवले. त्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलवण्यात आले. ऑडिशनच्यावेळी शुद्ध हिंदी भाषेतील काही संवाद मला बोलायला सांगितले होते. तसेच ओठो में ऐसी बात या गाण्यावर मला नृत्य करायला सांगितले होते. यानंतरच माझी निवड करण्यात आली.
हृतिकसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
मी शाळेत असल्यापासून हृतिकची फॅन आहे. मला आजही आठवतेय, मी माझ्या एका चुलत भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी मला त्याने कहो ना प्यार है या चित्रपटाविषयी सांगितले होते आणि हृतिकचे भलेमोठे पोस्टर दाखवले होते. त्या दिवसापासूनच मी त्याच्या प्रेमात पडले होते. हृतिकला भेटल्यानंतर स्क्रिनवर हा जितका सुंदर दिसतो, तितकाच खऱ्या आयुष्यातही दिसतो हीच माझी पहिली प्रतिक्रिया होती.
या चित्रपटासाठी तुला काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
या चित्रपटातील संवाद हे शुद्ध हिंदी भाषेत आहे. मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले तर माझी मातृभाषा तुलू आहे. त्यामुळे माझा हिंदीशी तितकासा संबंध नाहीये. त्यामुळे मी भाषेवर खूप मेहनत घेतली. तसेच या भूमिकेसाठी माझी असलेली केशभूषा सांभाळणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते. ही केशभूषा कमीतकमी पाच किलोची तरी होती. चित्रीकरण करताना मी माझ्या डोक्यावर काहीतरी भार उचलला आहे असेच मला वाटत असे. मी दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्याचा या चित्रपटासाठी मला खूप फायदा झाला. माझ्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाच्यावेळी फोकस हा शब्द मला कळायचाच नाही. थोडा फोकस देना असे मला म्हटल्यावर मी माझ्या कामावर पूर्ण फोकस देत आहे, अजून काय करू प्रश्न मला पडत असे. पण आता हळूहळू मला चित्रपटाची भाषा कळू लागली आहे.