अभिनेत्री रवीना टंडनविषयी एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मद्यधुंद अवस्थेत रवीनाने एका वयस्क महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आलीय. रवीनाच्या ड्रायव्हरने रात्री बांद्रा येथील रिझवी कॉलेजच्या परिसरात गाडी चालवली. त्यावेळी एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर रवीनाचा ड्रायव्हर गाडीबाहेर आला आणि त्याने वृद्ध महिला आणि त्यांच्या कुटुंबासोबत वादविवाद केले.
रवीनाने वृद्ध महिलेला केली मारहाण?
हा सर्व प्रकार चालू असताना रवीना टंडन गाडीबाहेर आली. ती काहीशी मद्यधुंद अवस्थेत होती. याच अवस्थेत तिने वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. वृद्ध महिला ७० वर्षांची आहे. या प्रकारामुळे इतर लोकांनी रवीनाला चांगलंच घेरलं. याशिवाय अनेक जणं ही घटना मोबाईलमध्ये कैद करत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल की, रवीना लोकांना "मला धक्का मारु नका, मोबाईलमध्ये शूट करु नका", अशी विनंंती करताना दिसतेय.
पोलीस स्टेशनपर्यंत गेलं प्रकरण
पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कारवाईत तब्बल ४ तास उशीर केला. 'रवीनाने मद्यधुंंद अवस्थेत आईला मारहाण केली. पोलिसांनी आम्हाला ४ तास वाट पाहायला लावली. याशिवाय हे प्रकरण बाहेरच सामंजस्याने मिटवायला सांगितलं. माझ्या आईवर अन्याय झाला असून मला न्याय हवा आहे', असं पीडित महिलेच्या मुलाने सांगितलं. दरम्यान या प्रकरणात रवीनाकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य बाहेर आलं नाहीय. हे प्रकरण कळताच रवीनाचे पती अनिल थडानींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.