कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प पडली आहे. आता अभिनेता रणवीर सिंग यालाही कोरोनाचा फटका बसला आहे. होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रणवीरच्या ‘83’ या आगामी सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता हा सिनेमा कधी रिलीज होईल, याबद्दल अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.रणवीरने स्वत: ट्वीटरवर ही माहिती दिली. 83 या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती त्याने दिली. ‘83 हा केवळ आमचा सिनेमा नाही तर संपूर्ण देशाचा सिनेमा आहे. परंतु देशाचे आरोग्य आणि सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. सुरक्षित राहा, काळजी घ्या. आम्ही लवकरच परत येऊ,’ असे रणवीरने सिंगने म्हटले आहे.
‘83’ या सिनेमात रणवीर सिंग भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे.
‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता.
रणवीर व दीपिकाश्विाय साकिब सलीम, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, आर. बद्री, साहिल खट्टर यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण कोरोनामुळे आता या सिनेमासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.