गरोदर असल्यामुळेच नेहा धूपियाने झटपट लग्न केल्याच्या चर्चेवर वडिलांनी केला ‘हा’ खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 12:40 PM
गरोदर असल्यामुळेच नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांनी झटपट लग्न उरकल्याची सध्या चर्चा आहे. या चर्चेवर नेहा धूपियाचे वडील प्रदीप धूपिया यांनी खुलासा केला आहे.
नुकतेच अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांनी लग्नाचा बार उडवून दिला. मात्र त्यांचे लग्न हे चाहत्यांबरोबरच बॉलिवूडलाही धक्का देणारे ठरले. दिल्ली येथील एका गुरुद्वारात दोघांनी अतिशय गुपचूपपणे लग्न उरकले. शिवाय लग्नाच्या त्याच सायंकाळी दोघेही यूएसला निघून गेले. मात्र नेहाने अचानक आणि एवढ्या तडकाफडकी का लग्न केले? असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना तिच्या वडिलांनी याबाबतचे उत्तर दिले आहे. असे म्हटले जात होते की, नेहा लग्नाअगोदरच गरोदर असल्याने तिने झटपट लग्न करण्याचा निर्णय घेतला. याविषयी नेहाचे वडील प्रदीप धूपिया यांनी सांगितले की, नाही... नाही... असे काहीही नाही. दोघांनी लवकर लग्न केल्याने लोक अशाप्रकारचा विचार करीत आहेत. मात्र असे काहीच नाही. बोलणारे तर काहीही बोलतात. त्यांच्या मनात येईल, अशा अफवा पसरवित असतात.’ प्रदीप धूपिया यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘हा दोघांचा आणि परिवाराचा निर्णय होता. खरं सांगायचे म्हणजे दोघांकडेही वेळ नव्हता. लग्नाची तारीख निश्चित केल्यानंतर दोघांनी केवळ एक-दोन दिवसांचा वेळ काढला होता. एवढ्या कमी वेळात केवळ काही विधीच पार पाडणे शक्य होते. नेहा आणि अंगद गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखत होते. ते दोघे चांगले मित्र होते. आम्ही तर हा विचार करीत होतो की, जर या दोघांनी लग्नाविषयी विचारले तर आम्ही लगेचच होकार देणार. जेव्हा त्यांनी आम्हाला लग्नाची परवानगी मागितली तेव्हा आम्ही लगेचच त्यास होकार दिला. प्रदीप धूपिया यांनी सांगिंतले की, ‘दोघांचे आपापले कमिटमेंट होते. बॉलिवूडमध्ये डेट्स मिळणे अवघड असते. मला फार माहिती नाही, मात्र तिच्या मॅनेजरने सांगितले की, कोणत्यातरी चॅरिटी शोसाठी ते दोघे यूएसला गेले आहेत. त्याठिकाणी ते ४-५ दिवस राहणार आहेत. यावेळी नेहाच्या वडिलांनी रिसेप्शनबद्दलही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, ‘आता दोघे पती-पत्नी झाले आहेत. आता त्यांची इच्छा असेल तर ते देतील. मला याविषयी काहीच माहिती नाही की, हे कधी आणि केव्हा होणार? आता ते परत आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतील.