शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'डंकी' (Dunki) सिनेमाची कहाणी पंजाब, पाकिस्तान, टर्की आणि लंडन या जागांभोवती फिरते. राजकुमार हिरानी यांनी प्रत्येक ठिकाणच्या सीनसाठी मेहनत घेतली आहे. सिनेमातील सहअभिनेत्री कोमल सचदेवाने (Komal Sachdeva) नुकतंच एका मुलाखतीत तिचा अनुभव सांगितला. टर्कीत दाखवण्यात आलेले सीन्स खरंतर सौदी अरेबियात शूट करण्यात आले होते. त्या १५ मिनिटांच्या सीनसाठी शाहरुखसह संपूर्ण स्टारकास्टने सौदीच्या वाळवंटात ४ दिवस काढले होते.
टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत कोमल म्हणाली,'जेव्हा आम्ही सौदीला पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण बिघडलं होतं. ते इतकं खराब होतं की आम्ही लगेच आमच्या भूमिकेत शिरलो. सगळ्या सोयीसुविधा असताना त्या वाळवंटात चालायचं, पळायचं आम्हाला कठीण जात होतं. त्यामुळे कोणत्याही सोयीशिवाय डंकी रुटने जाणाऱ्या नागरिकांसाठी हे किती कठीण असेल याची कल्पनाही करु शकत नाही. हेच डोक्यात ठेवून आम्ही तो सीन शूट केला आणि म्हणूनच तो सीन इतका प्रभावी झाला. १५ मिनिटांच्या त्या शॉटसाठी आम्ही ४ दिवस तिथे राहिलो आणि त्यापेकी दोन दिवस तर आम्ही फक्त पळतच होतो.'
ती पुढे म्हणाली,'वाळवंटात पळणं खरंतर खूप अवघड आहे. मला माझ्या कॉस्च्युमवर चांगले दिसतील असे बूट देण्यात आले होते. पण ते बूट घालून पळणं खूप अनकंफर्टेबल होतं. पण मी पळत होते आणि पळता पळता माझ्या पायातून बूट निघायचे. पण मला थांबायचं नव्हतं. कारण मी थांबले तर सीन पुन्हा शूट करावा लागणार होता. माझ्यासोबत इतरही कलाकार पळत होते. मग मला कळालं की सीननुसार ते लॉजिकल होतं कारण पळताना मला पहिली गोळी लागणार होती. दोन दिवस पळून आमचे पाय सूजले होते.'
सौदी अरेबियात शूट झालेल्या सीनमध्ये शाहरुख खान, तापसी पन्नू, विक्रम कोचर, कोमल सचदेव, विष्णु कौशल आणि दिवांशु आहेत. याशिवाय दोन फॉरेन कलाकारही आहेत. त्यांच्याबद्दल कोमल म्हणाली,'तुर्किश कलाकरांनीही खूप छान काम केलं आहे. त्यांनी सौदी अरेबियाच्या तेथील अधिकाऱ्यांचं काम केलं आहे. सीनमध्ये जेव्हा ते माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहतात तेव्हा मी खरंच घाबरले होते. त्या सीनमध्ये तुम्ही पाहाल मी शाहरुख सरांना पकडते आणि त्यांच्यामागे लपते. ते स्क्रीप्टमध्ये नव्हतं. मी घाबरलेच इतके होते की माझ्याकडून तसं झालं.'