वर्ल्डकप संपल्यानंतर क्रिकेटविश्वात आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्स टीमचा मेंटर होता. पण, आता तो कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक असणार आहे. नुकतीच गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. गंभीर पुन्हा KKR टीमला मार्गदर्शन करणार असल्यामुळे चाहत्यांबरोबरच KKRचा मालक शाहरुख खानही खूश झाला आहे.
2011 ते 2017 या काळात गंभीर KKR कडून खेळला. या काळात केकेआर संघाने दोनदा विजेतेपद पटकावले. KKR पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग T20 च्या अंतिम फेरीतही पोहोचले. त्यानंतर गंभीर लखनऊ टीमसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता. त्याची घरवापसी झाल्यानंतर शाहरुखने एक ट्वीट केलं आहे. शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या निमित्ताने एक्स वर Ask SRK सेशन घेतलं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने हटके अंदाजात उत्तरं दिली.
या सेशनमध्ये शाहरुखला चाहत्याने गौतम गंभीरबाबत प्रश्न विचारला. "गौतम गंभीर परत आपल्या KKR टीममध्ये...काय बोलता सर", असं चाहत्याने लिहिलं होतं. चाहत्याच्या या ट्वीटला शाहरुखने उत्तर दिलं आहे. "कारण गौतम गंभीर आपला आहे. केकेआरचा कर्णधार आणि कुटुंबही आहे," असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शाहरुख त्याच्या 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण, जवाननंतर शाहरुखच्या डंकी चित्रपटासाठी चाहते आतुर होते. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.२२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.