कोरोनासारखे जीवघेणे संकट आणि या संकटाशी लढण्यासाठी पुकारण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे तळहातावर पोट असणा-या हजारो जीवांची घालमेल सुरु आहे. लॉकडाऊनचा निर्णय अपरिहार्य आहे. पण रोजंदारीवर काम करणा-या मजूर सध्या हवालदिल आहेत. अशात अनेक जण या मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आता बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याने अशा 1 हजार कुटुंबाच्या भोजनाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे.संजय दत्तने खुद्द ही माहिती दिली़ ‘संपूर्ण देश सध्या गंभीर संकटातून जात आहे. अशा संकटाच्या घडीत माझ्याने शक्य होईल, तितकी मदत करतोय’ असे संजयने सांगितले आहे.
या मदतीसाठी संजयने सावरकर शेल्टर्ससोबत हातमिळवणी केली आहे. यामाध्यमातून बोरीवली, वांद्रे अशा भागातील 1 हजार गरजू कुटुंबाना जेवण पुरवले जात आहे.सध्या संजय सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची जनजागृती करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर करत, लोकांना घरात राहण्याचे आणि फिट राहण्याचे आवाहन केले होते.
संजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘सडक 2’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट, आदित्य राय कपूर, पूजा भट, गुलशन ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ या सिनेमातही संजय झळकणार आहेत. इतकेच नाही तर केजीएफ-चॅप्टर 2, भुज-द प्राईड आॅफ इंडिया या सिनेमातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे शूटींग, चित्रपटाचे रिलीज ठप्प आहे. पण येत्या काळात मुन्नाभाईचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.