बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता इरफान खानने आज जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी तो सामना करत होता. त्याच्या चाहत्यांना वाटत होते की तो या आजारावर मात करेल, मात्र या आजाराने त्याला अपयशी ठरविले.
इरफान खान जितका चांगला माणूस होता तितकाच तो चांगला अभिनेता होता. त्याने त्याच्या अभिनयाने सगळ्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. मात्र या आजारानंतर त्याला वाटलं की तो अॅक्टिंग विसरून गेला.
इरफान खान शेवटचा अंग्रेजी मीडियम चित्रपटात पहायला मिळाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना शूजित सरकारने एका मुलाखतीत सांगितले होते की, इरफान जेव्हा बऱ्याच कालावधीनंतर शूटिंग सेटवर परतला तेव्हा त्याला वाटले की तो अॅक्टिंग करू शकणार नाही. पण अॅक्टिंग त्याच्या रक्तातच होते.
शूजित सरकारने मुलाखतीत सांगितले होते की, इरफान खान शिवाय या चित्रपटात दुसरा कोणीच असू शकत नव्हते. त्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तो बरा होण्यासाठी एक वर्षे वाट पाहिली.
दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी सांगितले होते की, इतका वेळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर जेव्हा इरफान मला भेटायला आला तेव्हा तो एकदम कोऱ्या पाटीसारखा होता. त्याला वाटले होते की तो अभिनय विसरला आहे. मात्र जेव्हा त्याने शूटिंग सुरू केले तेव्हा त्याने ती गोष्ट चुकीची ठरवली. इरफान खान खूप चांगला कलाकार आहे. अभिनय त्याच्या रक्तातच आहे. मी त्याच्यासारख्या अभिनेत्यासोबत काम केले नाही.