Join us

'केदारनाथ' शूटिंगवेळी दिग्दर्शकाने साराविरोधात केलेली केस, सकाळी कोर्ट अन् रात्री व्हायचं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 5:18 PM

शूटिंग सुरु असतानाच अभिषेक कपूर यांनी सारा अली खानविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तेव्हा सेटवरचं वातावरण कसं असायचं हे त्यांनी सांगितलं.

दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांच्या 'केदारनाथ' सिनेमातून सारा अली खानने (Sara Ali Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेमात सुशांत सिंह राजपूतसोबत ती झळकली. २०१८ साली आलेला हा सिनेमा प्रेक्षकांनाही आवडला होता. सिनेमाच्या शूटिंगचा एक किस्सा अभिषेक कपूर यांनी नुकताच सांगितला. शूटिंग सुरु असतानाच अभिषेक कपूर यांनी सारा अली खानविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तेव्हा सेटवरचं वातावरण कसं असायचं हे त्यांनी सांगितलं.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक कपूर म्हणाले, "मूव्ही मेकिंग सोपं काम नाही. सिनेमा बनवताना येणारे अडथळे तुम्हाला दूर करावे लागतात.  जेव्हा सारा अली खानला सिनेमासाठी साईन करण्यात आले तेव्हा तिच्या मॅनेजिंग कंपनीने ती सर्व तारखांना उपलब्ध असेल अशी माहिती दिली. नंतर तेव्हा माझं शूट जुलैपर्यंत लांबलं तेव्हा मात्र कंपनीने सांगितलं की ती जुलैमधील तारखा देऊ शकत नाही. मला सिनेमा पूर्ण करायचा होता त्यामुळे मी त्या तारखा जाऊ देऊ शकत नव्हतो. मोठा सेटही लावला होता."

ते पुढे म्हणाले, "काही धोकेबाज लोकांमुळे मला आर्थिक नुकसानही झेलावं लागलं होतं. त्यामुळे मी सिनेमा थांबवू शकणार नव्हतो. नाईलाजाने मला साराला कोर्टात खेचावे लागले. तारखा परत मिळवण्यासाठी प्रकरण कोर्टात गेलं. दिवसा आम्ही कोर्टात आमने सामने होतो, तर संध्याकाळी मी आणि सारा मंदिरात महत्वाचे सीन शूट करायचो."

'सिनेमा माझ्यासाठी जितका महत्वाचा होता तितकाच तो सारासाठीही होता. कशीही परिस्थिती असो शेवटी सीन शूट करताना मी दिग्दर्शक आणि समोरचा कलाकारच असतो. शेवटी आमचं हे भांडणं कोर्टाच्या बाहेरच सुटलं.' असंही ते म्हणाले.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडन्यायालयकेदारनाथसुशांत सिंग रजपूत