Join us  

 Video: पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला Farhan Akhtarच्या लाईव्ह कॉन्सर्टचा स्टेज, चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 12:14 PM

Farhan Akhtar : इंदूरमध्ये फरहान अख्तरचा एक ग्रँड लाईव्ह कॉन्सर्ट होणार होता. यासाठी एक भव्य स्टेज साकारण्यात आला होता. पण धुळीचं वादळ आलं आणि...

फरहान अख्तर ( Farhan Akhtar) हा केवळ अभिनेता, दिग्दर्शक व लेखकच नाही तर एक लोकप्रिय गायकही आहे. फरहानचा फरहान लाईव्ह नावाचा स्वत:चा बँड आहे. आपल्या या बँडसोबत फरहान जगभर लाईव्ह कॉन्सर्ट करतो. इंदूरमध्येही फरहानचा एक ग्रँड लाईव्ह कॉन्सर्ट होणार होता. यासाठी एक भव्य स्टेज साकारण्यात आला होता. पण धुळीचं वादळ आलं आणि या वादळाने एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं. होय, वादळामुळे फरहानच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी उभारण्यात आलेला स्टेज पत्त्यासारखा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. वादळामुळे फरहानच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी उभारण्यात आलेला स्टेज कोसळतो. यानंतर कार्यक्रमस्थळी एकच धावपळ सुरू झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतेय.

या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट करताना फरहानची खिल्ली उडवली आहे. निसर्गाने लोकांना फरहानपासून वाचवलं, अशी कमेंट एका युजरने केली आहे. इंदौर में सब के कॉन्सर्ट फेल हो जाते है, असं अन्य एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे. फरहान अख्तरचाही कॉन्सर्ट होतो... याचा फाटका आवाज ऐकायला कोण येत असेल, अशा शब्दांत एका युजरने फरहानला ट्रोल केलं आहे. हे इंदूर आहे भावा, इथे फक्त किर्तनाला परवानगी आहे, अशी कमेंटही एका युजरने दिली आहे.फरहान अख्तरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. फायर, फुकरे ३, जी ले जरा अशा अनेक चित्रपटांमुळे त्याचीर चर्चा होतेय. जी ले जरा हा सिनेमा फरहान दिग्दर्शित करणार आहे. यात प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ व आलिया भट या तिघी दिसणार आहेत. 

टॅग्स :फरहान अख्तर