बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा नेहमी चर्चेत असतो. नुकतेच त्याचा फॅमिली ड्रामा असलेला 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या तो अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रमोशन करत आहे. यामध्येच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने करिअरच्या सुरवातीच्या काळावर भाष्य केलं.
'करिअरच्या सुरवातील मला अनेक नकार पचवावे लागले. जाहिरातही न मिळाल्याने निराश व्हायचो. पण, आई मला धीर द्यायची. ती म्हणायची, 'काळजी करू नको, तु फक्त विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल. देव सगळं पाहतोय'. छोट्या-छोट्या पावलांनी मी सुरुवात केली. मसानमध्ये काम केल्यानंतर मला थोडी ओळख मिळाली. निर्मात्यांचे फोन येऊ लागले. पण, खरं यश उरी-द सर्जिकल स्ट्राइकमधून मिळालं'.
पुढे तो म्हणाला, 'बॉलिवूडमधील माझा आतापर्यंतचा प्रवास हा जादूई वाटतो. अनेक लोक खूप मेहनत घेतात. पण, यशस्वी होत नाहीत. मी स्वतःला भाग्यवान समजतो की देवाने माझी निवड केली'.
विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमात मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. याबरोबर मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर विकीच्या या आगामी सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.