मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगला होता. त्यावेळी, संजय राऊत यांनी कंगनावर थेट प्रहार केला होता. त्यानंतर, कंगनानेही शिवसेनेला लक्ष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सध्या शिवसेना पक्षात झालेल्या बंडामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची अडचणीत आली असून संजय राऊत यांचाही चेहरा उतरल्याचे दिसून येते. एकंदरीत शिवसेना पक्षातील या बंडखोरीमुळे शिवसेनेवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, त्यावेळी कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेलं एक ट्विट सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.
कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद रंगल्यानंतर कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडला होता. त्यानंतर, कंगनाने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. कंगनाने व्हिडिओ ट्विट करुन, आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुडेगा ! याद रखना, ये एक जैसा नही रहता, असे कंगनाने म्हटले होते.
एकनाथ शिंदेसह ४० आमदार गुवाहटीत
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबतच राहणार का किंवा ते वेगळा गट स्थापन करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.