टीव्हीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरची ‘एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2’ही वेबसीरिज सध्या चांगलीच वादात सापडली आहे. ‘बिग बॉस 13’चा स्पर्धक राहिलेल्या हिंदुस्तानी भाऊने या सीरिजमधील काही सीन्सवर आक्षेप घेत, एकता व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला. पाठोपाठ एकताला कायदेशीर नोटीस पाठवली. पण आता एकताने यावरचे मौन सोडत हिंदुस्तानी भाऊवर गंभीर आरोप केले आहेत.
शोभा डे यांना दिलेल्या मुलाखतीत एकता या संपूर्ण प्रकरणावर बोलली. माझ्या वेबसीरिजमध्ये काही आक्षेपार्ह दृश्ये असतील तर त्यावर माफी मागणे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. हे सीन्स आम्ही कधीच हटवले आहेत. मात्र सायबर बुलिंग करणा-यांना मात्र मी कधीच भीक घालणार नाही. काही लोकांनी इंटरनेटवर माझ्या इभ्रतीचे धिंडवडे काढणे सुरु केलेय. तो (हिंदुस्तानी भाऊचा नामोल्लेख टाळत) जेंटलमॅन स्वत:ला देशभक्त समजतो आणि मला आणि माझ्या आईला शिव्या घालतो. मला उघडपणे रेपच्या धमक्या देतो. आता हा आर्मी वा सेक्शुअल कंटेन्टचा प्रश्न नाही. कारण आता तुम्ही एका मुलीला, तिच्या 71 वर्षांच्या आईला बलात्काराच्या धमक्या देत आहात. सेक्स वाईट, रेप चांगला असा तुमचा अर्थ आहे का? असा सवाल तिने केला.
एक नागरिक या नात्याने मी भारतीय आर्मीचा पूर्ण सन्मान करते. यात कोणतीही शंका नाही की आपल्या सर्वांच्या सुरक्षेत त्यांचे खूप मोठं योगदान आहे. कोणतीही मान्यता प्राप्त सैन्य संघटना किंवा संस्था आम्हाला माफी मागायला सांगत असेल तर आम्ही माफी मागण्यास तयार तयार आहोत. मात्र असभ्यरित्या सायबर बुलिंग आणि असामाजिक तत्त्वांकडून दिल्या जाणा-या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. वेबसीरिजमधील तो वादग्रस्त सीन काल्पनिक होता. आमची चूक झाली होती आणि आम्ही ती कधी सुधारली आहे. तो सीन कधीच गाळण्यात आला आहे. याप्रकरणी माफी मागणे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. पण याप्रकरणी मला ज्या प्रकारच्या धमक्या मिळत आहेत, त्याला सभ्यपणा म्हणता येणार नाही, असेही ती म्हणाली.
एकताच्या संबंधित वेबसीरिजमध्ये इंडियन आर्मीचा अपमान झाला असल्याचा हिंदुस्तानी भाऊचा आरोप आहे. याप्रकरणी हिंदुस्तानी भाऊने एकता व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय एकताला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. या नोटीसनुसार एकता कपूरला आर्मीची माफी मागावी लागेल आणि 100 कोटी रुपये एवढी पॅनल्टी भारत सरकारला द्यावी लागेल. एकता कपूरला तिची अडल्ट वेब सीरिज ‘एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2’मधील सर्व आपत्तिजनक दृष्य हटवावी लागतील.