सोशल मीडिया सेन्सेशन आणि मॉडेल पूनम पांडे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला सकाळी पूनमच्या इन्स्टाग्रामवरुन तिचं निधन झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने तिचा मृत्यू झाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. पण, तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता. अखेर शुक्रवारी सकाळी इन्स्टा लाइव्हवरुन पूनमने ती जिवंत असून तिचा मृत्यू गर्भाशयाच्या कॅन्सरने झाला नसल्याचं सांगितलं. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे नाटक केल्याचंही पूनमने सांगितलं. पूनमच्या या कृत्यानंतर मात्र तिला ट्रोल केलं जात आहे. दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरनेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सर्व्हायकल कॅन्सर आणि तिच्या या कॅम्पेनबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर एकता कपूरने कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. "व्हॅक्सिनसाठी अशा पद्धतीने केलं गेलेली जनजागृती उपयोगाची नाही. अशा असंवेदनशील कॅम्पेनला प्रोत्साहन देणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे" असं तिने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
पूनम पांडेने सर्व्हायकल कॅन्सर आणि त्याच्या जनजागृतीसाठी (https://www.poonampandeyisalive.com/) ही वेबसाइटही लॉन्च केली आहे. पण, गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाल्याचं नाटक केल्याने तिच्यावर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. पूनमच्या मृत्यूवर आधीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं गेलं होतं. पण, अखेर व्हिडिओ शेअर करत तिने कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी हे नाटक केल्याचं स्पष्ट करत चाहत्यांचा संभ्रम दूर केला.