ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या दु:खातून इंडस्ट्री सावरली नसताना आज बॉलिवूडवर दुसरा मोठा आघात झाला. भयपटांचे अर्थात हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणा-या रामसे बंधुंपैकी ( Ramsay Brothers) कुमार रामसे (Kumar Ramsay ) यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी तसेच राज, गोपाल व सुनील अशी तीन मुलं आहेत. कुमार यांचा मोठा मुलगा गोपाळ यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कुमार रामसे यांचे निधन झाले.
कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचा पुत्र होते. कुमार आपल्या सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता. 2019 मध्ये श्याम रामसे यांचे निधन झाले होते.
रामसे बदर्स त्यांच्या हॉरर सिनेमांसाठी ओळखले जातात. पुराना मंदिर, साया, खोज अशा कितीतरी हॉरर सिनेमांची निर्मिती या ब्रदर्सने केली. काळ रोमॅन्टिक चित्रपटांचा होता. मात्र रामसे बंधुंनी हॉरर सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. और कौन आणि दहशत या चित्रपटांची निर्मिती कुमार रामसे यांनी केली होती. रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिण्यात त्यांचे मोठे योगदान होते.