कंगना राणौतचा रिलीज झालेला 'इमर्जन्सी' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाची सुरुवातीपासून हवा होती. दोन वेळा सिनेमाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली. अखेर 'इमर्जन्सी' नवीन वर्षात रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु 'इमर्जन्सी' सिनेमाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला लंडनमध्ये विरोध करण्यात आलंय. इतकंच नव्हे तर सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांनाही धमकावण्यात आलंय.
'इमर्जन्सी' सिनेमाला लंडनमध्ये कडाडून विरोध
लंडनमधील कंजर्वेटिव पार्टीचे संसद सदस्य बॉब ब्लॅकमॅन यांनी 'इमर्जन्सी' सिनेमाला कडाडून विरोध केलाय. याशिवाय गृह सचिवांना या प्रकरणात दखल घ्यायला सांगितलीय. तसंच जे प्रेक्षक सिनेमा पाहायला गेले होते त्यांना बॉबने धमकावलं असल्याचं प्रकरणही उघड झालंय. बॉब ब्लॅकमॅन हे लंडनमधील निर्वाचित क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात. याशिवाय त्या भागातील खलिस्तानी समर्थकांनी लोकांना सिनेमा बघू नका, म्हणून धमकी दिलीय.
याचा परिणाम लंडनमध्ये 'इमर्जन्सी'च्या शोवर झाला असून सिनेवर्ल्ड, सिनेमाव्यू यांसारख्या सिनेमा थिएटरच्या साखळ्यांनी 'इमर्जन्सी' सिनेमा थिएटरमधून हटवण्याचा निर्णय घेतलाय. 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमावर पंजाबमध्ये बंदीची मागणी करण्यात आली. याशिवाय सेन्सॉरनेही सिनेमावर कात्री लावून काही सीन्स हटवण्याचा निर्णय घेतला.