Join us

'ते सीन केले पण शेवटी...'; 'या' कारणामुळे इमरान हाश्मीला बंद करावे लागले सिनेमातील किसिंग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:33 IST

emraan hashmi: अनेक सिनेमात किसिंग सीन दिल्यामुळे इमरानच्या नावापुढे सिरीअल किसर हा टॅग लागला होता. विशेष म्हणजे या भूमिका करण्यामागचं कारण आणि अचानकपणे त्या भूमिका नाकारण्याचं कारण त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिनेता म्हणजे इमरान हाश्मी (emraan hashmi). आजवरच्या कारकिर्दीत इमरानने अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. परंतु, काही मोजक्या सिनेमांमध्ये किसिंग सीन दिल्यामुळे सिरीअल किसर ही त्याची ओळख निर्माण झाली होती. सध्या इमरान त्याची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गेल्या काही काळात तो यांसारख्या भूमिका धुडकावून लावत आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सतत एकाच धाटणीच्या भूमिका केल्यामुळे काय झालं, त्याचा त्याच्या कुटुंबावर काय परिणाम झाला हे त्याने सांगितलं.

इमराने त्याच्या कारकिर्दीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. यात फुटपाथ या सिनेमामधून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर मर्डर, आशिक बनाया आपने, अक्सर या सिनेमात त्याने बरेच किसिंग सीन दिले. ज्यामुळे इंडस्ट्रीतील सिरीअल किसर हे त्याची इमेज तयार झाली होती. इतकंच नाही तर यामुळेच निर्मातेदेखील त्याला याच धाटणीच्या भूमिका ऑफर करत होते. परंतु, याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होऊ लागला होता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं.

निर्मात्यांनी घेतला गैरफायदा

'आता तू किसिंग सीन देणं का थांबवलं?' असा प्रश्न इमरानला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर, "हा निर्णय मी माझ्या पत्नीच्या सल्ल्याने घेतला. मी तिचं कायम ऐकतो. मी सध्या माझ्या सिनेमांमध्ये किसिंग सीन ठेवत नाही. खरंतर आधीपासूनच मला या अशा सीन्सवर आक्षेप घ्यायचा होता. पण माझी सिरीअल किसर ही प्रतिमा नकळतपणे तयार होत गेली. आणि, निर्मात्यांनीही त्याचा गैरफायदा घेतला. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ती गोष्ट आवश्यक ठरु लागली", असं इमरान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मी माझे सिनेमा पाहतो त्यावेळी मलाच वाटतं की त्या ठिकाणी किसिंग सीनची अजिबात गरज नव्हती. पण, प्रेक्षकांना तेच हवं होतंच. मी सिनेमाची गरज म्हणून ते सीन केले. पण, शेवटी टीकेचा भडीमारही माझ्यावर झाला."दरम्यान, इमरान अलिकडेच 'टायगर 3' या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता शोटाइम या वेबसीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोहर व अपूर्व मेहता यांनी या सीरिजची निर्मिती केली असून हा शो डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :इमरान हाश्मीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमासलमान खान