आपल्या अभिनयाने आणि सुपरहिट सिनेमे देऊन इमरान हाश्मीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. पण, प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसा कठीण काळ इमराननेही अनुभवला. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना आणि हॅपी फॅमिला लाइफ सुरू असताना इमरानच्या ३ वर्षांच्या मुलाला कॅन्सर असल्याचं समजलं. यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच इमरान त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाबाबत बोलला.
इमरानने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये कठीण काळाबद्दल बोलताना त्याने लेक अयानच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं.
३ वर्षांचा असताना मुलाला कॅन्सर
"२०१४ मध्ये माझा मुलगा जेव्हा आजारी पडला तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ होता. तो कठीण काळ मी शब्दांत मांडू शकत नाही. ५ वर्ष आम्ही या कठीण काळाचा सामना केला. पण, या काळात मी खूप काही शिकलो. जानेवारी २०१४ मध्ये माझा मुलगा आजारी पडला. आणि आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला. त्या एका क्षणात माझं आयुष्य बदलून गेलं. १३ जानेवारीला आम्ही ताज हॉटेलमध्ये मुलासोबत पिझा खात होतो. माझ्या पत्नीसोबत म्हणजे त्याच्या आईबरोबर तो लघवीसाठी गेला होता. त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडताना दिसलं. ते कॅन्सरचं पहिलं लक्षण होतं. त्यानंतर पुढच्या ३ तासांत आम्ही एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये होतो. आणि डॉक्टर आम्हाला सांगत होते की तुमच्या मुलाला कॅन्सर आहे. तुम्हाला त्याला उद्या ऑपरेशनसाठी घेऊन यायचं आहे. आणि त्यानंतर त्याची किमोथेरेपी करावी लागेल. त्या १२ तासांत माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्याची लक्षणंही आम्हाला काही दिसली नव्हती. त्याचं वय तेव्हा फक्त ३ वर्ष ११ महिने इतकं होतं. हा कॅन्सर ४ वर्षांखालील मुलांना होतो".
"जेव्हा आम्हाला याबाबत समजलं तेव्हा आम्ही आमच्या मुलासमोर रडूही शकत नव्हतो. कारण, त्याच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं होतं. फक्त तो एकच दिवस होता जेव्हा आमच्या कुटुंबातले सगळे रडले. पण, त्यानंतर सगळं काही ठीक होईल, ही आशा प्रत्येकाला होती. यामध्ये पहिले ६ महिने केमोथेरेपी आणि नंतर पुन्हा कॅन्सर होऊ नये म्हणून पाच वर्ष उपचार सुरू होते. प्रत्येक ३ महिन्यांनी टेस्ट करावी लागायची. मी त्यावर एक पुस्तकही लिहिलं आहे. हे माझ्याबरोबरच का होतंय? असा प्रश्न मला पडायचा. मला खूप राग येत होता. एक पालक म्हणून आम्हाला कुठेच कमी पडायचं नव्हतं. म्हणून मी कॅन्सरबद्दल सगळं काही वाचलं. जेव्हा मी डॉक्टरांना भेटायचो तेव्हा तेही मला विचारायचे की तुला इतकं सगळं कसं माहीत. त्या कॅन्सरबद्दल त्याच्या ट्रीटमेंटबद्दल मी सगळं काही माहीत करून घेतलं होतं".