सध्या सगळीकडे राजकीय वातावरण आहे. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. त्यातच मनोरंजनसृष्टीतही राजकारणाचं वारं आहे. अभिनेत्री कंगना रणौतला भाजपकडून थेट लोकसभेचं तिकीटच मिळालं आहे. तर अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. यातच आता अभिनेता इमरान हाश्मीराजकारणात एन्ट्री घेणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
इमरान हाश्मीने विविध भुमिका साकारत आता 'सिरियल किसर' हा टॅग मागे टाकला आहे. "टायगर 3' चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसलेला इम्रान नुकेतच प्रदर्शित झालेल्या 'ए वतन मेरे वतन वतन' या चित्रपटात दिसला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रमुख भूमिका बजावणारे राजकारणी राम मनोहर लोहिया यांची भूमिका त्यानं पार पाडली. दैनिक जागरणशी बोलताना इम्रान हाश्मीनं राजकारणावर भाष्य केलं.
तो म्हणाला, 'मला राजकारणात तितकासा रस नाही किंवा तेवढे ज्ञानही नाही, पण जेव्हा एखादा दिग्दर्शक किंवा लेखक माझ्याकडे येतो. तेव्हा त्या व्यक्तीबद्दल जाणून घेणे माझं कर्तव्य ठरतं. तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुम्हाला काही गोष्टी आवडतात आणि काही आवडत नाहीत. राजकारणात येण्याचा विचार कधीच केला नाही, पण असं म्हणतात की, कोणत्याही गोष्टीला कधीही नाही म्हणू नये'.
पुढे तो म्हणाला, 'भविष्यात जर माझा राजकारणाकडे कल वाढला तर मला माझ्या प्रेक्षकांसाठी काहीतरी करायला आवडेल. कलाकार जेव्हा राजकारणात जातात तेव्हा त्यांच्यावर जनतेची जबाबदारी असते. ज्यांच्यामुळे ते कलाकार झाले आहेत. करिअरमध्ये मदत होईल, असा विचार करून राजकारणात येऊ नये असं मला वाटतं'. मनोरंजनसृष्टी आणि राजकारण यांचा संबंध फार जुना आहे. आजवर अनेक कलाकारांनी राजकारणात एंट्री घेत नशीब आजमावलं आहे. त्यामुळे भविष्यात जर इमरान हाश्मी राजकारणात उतरला तर वावगं वाटायला नको.