बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा पाच वर्षाचा मुलगा अयानने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. अयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले होते. आता अयानचा कर्करोग बरा झाला असून इम्राननेच काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली होती. अयानला कर्करोग झाला हे कळल्यानंतर इम्रान आणि त्याची पत्नी दोघेही पूर्णपणे तुटले होते. पण त्यांनी कधीच ही गोष्ट त्यांच्या मुलाला दाखवून दिले नाही.
अयानला कर्करोग आहे याचे निदान झाल्यानंतर त्याला अनेक गोष्टींचे पथ्य पाळायला डॉक्टरांनी सांगितले होते. त्याला अनेक पदार्थ खायला देखील मनाई करण्यात आली होती. जंक फुडमुळे त्याच्या तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे होते आणि त्यामुळे त्याला जंक फूड न खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्याकाळात अयानसोबतच इम्रान आणि त्याच्या पत्नीने देखील जंक फूड खाणे पूर्णपणे सोडले होते. इम्राननेच या गोष्टी द किस ऑफ लाईफ या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत.
इम्रान हाश्मीने त्याच्या द किस ऑफ लाईफ या पुस्तकात त्याच्या बॉलिवूडमधील पदार्पणाविषयी देखील लिहिले आहे. इम्रानने अक्सर या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण या पुस्तकात इम्रानने खुलासा केला आहे की, त्याने लहानपणी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्याने धुंध या मालिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा असिस्टंट म्हणून काम केले होते. त्याने या मालिकेसाठी विक्रम भटला असिस्ट केले होते. त्यानंतर कसूर या चित्रपटासाठी त्याने विक्रमकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. पण डायरेक्शनच्या जबाबदाऱ्या आपण सांभाळू शकत नाही हे इम्रानने ओळखले आणि तो अभिनयाकडे वळला.
इम्रानचा काल म्हणजेच 24 मार्चला वाढदिवस होता. त्याने आजवर मर्डर, गँगस्टर, वन्स अपॉन टाईम इन मुंबई, मर्डर 2, द डर्टी पिक्चर, जन्नत 2, शांघाई यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.