‘इंग्लिश विंग्लिश’ या गाजलेल्या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले. सुजाता यांना मेटास्टेटिक कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहोचला होता. यामुळे शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. मुंबईच्या लीलावती रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. याचदरम्यान काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. सुजाता कुमार या सुचित्रा कृष्णमुर्ती यांच्या भगिनी. सुचित्रा यांनीच सोशल मीडियावर सुजाता यांच्या निधनाची माहिती दिली. १८ आॅगस्टला सुचित्रा यांनी बहिण सुजाता आयसीयूमध्ये असल्याचे सांगत, चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. यानंतर काल रात्री त्यांनी ट्विट करून सुजाता यांच्या निधनाचीच बातमी शेअर केली. आता आयुष्य आधीसारखे होऊच शकत नाही, असे त्यांनी लिहिले.
सुजाता यांना यापूवीर्ही कॅन्सरने ग्रासले होते. मात्र ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी कॅन्सरमुक्त झाल्याचे सांगितले होते. पण यानंतर काही महिन्यांतचं कॅन्सरने त्यांना पुन्हा गाठले. ‘इंग्लिश विंग्लिश’मधील सुजाता यांचा अभिनय वाखाणल्या गेला होता. छोट्या पडद्यावरील ‘होटल किंगस्टन’, ‘बॉम्बे टॉकिंग’आणि ‘२४’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. आनंद. एल.राय यांचा ‘रांझना’, करण जोहर निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटामध्येही त्या झळकल्या होत्या.