दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा आगामी चित्रपट 'लाहोर १९४७' (Lahore 1947)बाबत दररोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर राजकुमार संतोषी, आमिर खान आणि सनी देओल हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. आता या चित्रपटात खलनायकाची भूमिका कोण साकारणार आहे? 'लाहोर १९४७'च्या खलनायकाबाबत बऱ्याच दिवसांपासून सस्पेंस होता, मात्र आता निर्मात्यांनी या सस्पेन्सवरून पडदा उचलला आहे आणि 'लाहोर १९४७'मध्ये खलनायक कोण असणार हे उघड केले आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिमन्यू सिंगला फायनल करण्यात आले आहे.
याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी म्हणाले की, “सामान्यत: जेव्हाही आपण खलनायकाच्या पात्राचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिली नावे येतात ती म्हणजे अमरीश जी आणि डॅनी जी. मात्र आपल्याला पुढे पाहावे लागेल. पाहावे लागेल की ही जबाबदारी कोण सांभाळेल. विशेष म्हणजे, आम्ही अभिमन्यू सिंगला आणले आहे जो लाहोर १९४७ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत एक मजबूत आणि मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याची तीव्रता, त्याचा आवाज आणि त्याचा विश्वास खरोखरच अतुलनीय आहे. तो नक्कीच आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे.
अभिमन्यू सिंग दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
अभिमन्यू सिंगने हिंदी, तेलुगू आणि तमीळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. लक्ष्य, ढोल, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा!, गोलियों की रासलीला राम-लीला, बच्चन पांडे, किसी का भाई किसी की जान आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्याने नेहमीच आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे आणि आता लाहोर १९४७ मध्ये त्याला खलनायकाच्या भूमिकेत पाहणे हा नक्कीच एक चांगला अनुभव असेल.
'लाहोर १९४७' बद्दल
'लाहोर १९४७' बद्दल सांगायचे तर, आमिर खान त्याच्या प्रोडक्शन बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहे, तर दिग्दर्शक राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहेत.