Join us  

राजकारणी झाले तरी ‘ते’ हाडाचे कलाकारच : सचिन खेडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 2:41 PM

कलाकार आणि राजकारण हे समीकरण काही नवीन नाही. ही मंडळी कलाकार असली तरी कालांतराने त्यांची वैचारिक बांधिलकी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी जुळली जाते. त्यामुळेच एकेकाळी पडदा गाजविणारे काही दिग्गज कलाकार आज राजकारणाच्या सरीपाटावरही आपली छाप सोडत आहेत.

सतीश डोंगरेकलाकार आणि राजकारण हे समीकरण काही नवीन नाही. ही मंडळी कलाकार असली तरी कालांतराने त्यांची वैचारिक बांधिलकी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी जुळली जाते. त्यामुळेच एकेकाळी पडदा गाजविणारे काही दिग्गज कलाकार आज राजकारणाच्या सरीपाटावरही आपली छाप सोडत आहेत. याचा अर्थ त्यांच्यातील कलाकार लुप्त झाला असा नसून, आजही त्यांच्या अभिनयात पहिल्यासारखाच दम आहे. कारण ते हाडाचे कलाकार असल्याचे अभिनेता सचिन खेडेकर सांगतात. ‘एक थी रानी ऐसी भी’ या चित्रपटात ड्रिम गर्ल हेमामालिनी आणि विनोद खन्ना या राजकारणी तथा दिग्गज कलाकारांसोबत प्रमुख भूमिका साकारत असलेल्या सचिन खेडेकरशी साधलेला हा दिलखुलास संवाद...प्रश्न : हेमामालिनी, विनोद खन्ना या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा सांगाल?- एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर पडदा गाजविणाºया हेमामालिनी आणि विनोद खन्ना या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीयच म्हणावा लागेल. कारण यांच्यासोबत काम करण्याच्या संधीकडे मी व्यक्तिगत फायदा म्हणून बघतो. शिवाय राष्टÑीय पुरस्कार विजेते तथा डाक्युमेंटरी मेकर गुलबहार सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याने काम करायला खूप मजा आली. चित्रपट वेगळ्या धाटणीचा असल्याने अतिशय अभ्यासपूर्ण अशा स्क्रिप्टवर काम केल्याचे समाधान वाटते. प्रश्न : ‘एक थी रानी ऐसी भी’ या चित्रपटाची कथा राजकारणाशी मिळती जुळती आहे, शिवाय विनोद खन्ना - हेमा मालिनी हे राजकारणाच्या सारीपाटावर आपली छाप सोडत आहेत, त्याची चुणूक शूटिंगदरम्यान बघावयास मिळाली काय?- खरं तर हे दोन्ही कलाकार हाडाचे आहेत. राजकारणात असणं किंवा खासदारकी मिळवणं हा त्यांचा अतिरिक्त गुण म्हणावा लागेल. मात्र कलाकार म्हणून त्यांचे काम खूपच मोठे आहे. या चित्रपटात त्यांच्या वाट्याला आलेली पात्रं त्यांनी जीवंत केली असून, ते मला जवळून बघता आल्याचे समाधान वाटते. कारण माझ्या मते, अशा मोठ्या माणसांबरोबर काम करण्याची संधी अभावानेच मिळत असते. प्रश्न : मध्यंतरीच्या काळात विनोद खन्ना यांची तब्येत खूपच खालावली होती, शूटिंगदरम्यानही त्यांची प्रकृती अस्वस्थ होती काय?- होय, शूटिंगदरम्यान एक दोन वेळा त्यांना बरं नव्हतं. त्यावेळेस आम्हाला काही काळ शूटिंग थांबवावी लागली. मात्र त्यांनी काम अर्धवट सोडण्याचा अजिबात विचार केला नाही. जेव्हा-जेव्हा त्यांना प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वाटले तेव्हा त्यांनी स्वत:हून फोन करून शूटिंग पूर्ण करण्याचे सांगितले. मात्र आम्हाला त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटायची; पण त्यांनी काम अर्धवट सोडले नाही. खरं तर या चित्रपटाचे शूटिंग आम्ही गेल्यावर्षीच पूर्ण केले. प्रश्न : ‘राजपथ ते जनपथ’ ही संकल्पना कशी स्पष्ट कराल?- सध्याच्या गोव्याच्या राज्यपाल मृदृला सिन्हा यांच्या ‘राजपथ ते जनपथ’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. पुस्तकात विजया राजे सिंधिया यांचा जीवनपट खूपच प्रभावी पद्धतीने मांडला आहे. कारण ही राणी प्रजेवर अन् प्रजा राणीवर प्रेम करणारी असते. मात्र आणीबाणीनंतर मुलामध्ये वितुष्ट निर्माण होते अन् घरात दोन पक्ष येतात. येथूनच संघर्षाला सुरुवात होते. विजया राजे सिंधिया यांची भूमिका हेमामालिनी यांनी साकारली आहे. जिवाजीराजेंच्या भूमिकेत विनोद खन्ना आहेत, तर मी सरदार आग्रेंचा पुत्र बाळ आग्रेंच्या भूमिकेत आहे. प्रश्न : तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा ‘सैलाब’ येणार अशी चर्चा आहे, याविषयी काय सांगणार?- खरं तर ही चर्चा माझ्याही कानावर पडली. परंतु महिला दिनानिमित्त आम्ही एक फिल्म केली, त्यावेळेस आम्ही एकत्र आलो होतो. रेणुका शहाणे यांनी ‘२० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार’ असे ट्विट केल्याने ही चर्चा रंगली होती. परंतु रेणुका शहाणे यांच्याबरोबर पुन्हा एकत्र काम करायला मला आवडेल. प्रश्न : आगामी चित्रपटांबाबत काय सांगाल?- मराठी मी ‘मुरांब्बा’ नावाच्या चित्रपटात काम करीत आहे. दि. २ जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात माझ्यासोबत चिन्मय सुर्वे, अमेय वाघ, मिथीला पालकर यांच्या भूमिका असून, हा कौटुंबिक चित्रपट आहे. हिंदीमध्ये ‘गोलमाल अगेन’ आणि ‘जुडवा २’मध्येदेखील काम करीत आहे.