>> संजय घावरे
राजकुमार हिरानीं(Rajkumar Hirani)नी दिग्दर्शित केल्याने शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या 'डंकी'(Dunki)ला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. रिलीज झाल्यापासून 'डंकी'ने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मी नागपूरचा असल्याने 'लोकमत'ची आठवण येताच नागपूरचीही आठवण येते असं म्हणत राजकुमार हिरानींनी 'डंकी'बाबत दिलखुलास गप्पा मारल्या...
- 'डंकी'च्या रिलीजनंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत?एकाच प्रकारचे अॅक्शन चित्रपट येत असताना वेगळ्या विषयावर चित्रपट बनवल्याबद्दल लोकं कौतुक करत आहेत. हे ऐकून खूप चांगलं वाटतं. फिल्ममेकर म्हणून प्रत्येक वेळी नवीन कथा सांगण्याचा प्रयत्न असतो, जो 'डंकी'मधूनही केला आहे. 'मुन्नाभाई', 'पीके', '३ इडियट्स'मध्येही नवीन देण्याचाच प्रयत्न होता. परदेशातून खूप इमोशनल प्रतिक्रिया आल्या. हि तर आमची कहाणी असल्याचं काहींनी सांगितलं. कॅनडा, लंडन, न्यूयॅार्कमधून रिअॅक्शन्स आल्या आहेत.
- बेकायदेशीर इमिग्रेशनवर चित्रपट बनवण्याची कल्पना कशी सुचली?'पीके'साठी ईटलीमध्ये रेकी करताना एका टाऊन स्क्वेअरमध्ये एक व्यक्ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बनून उभा होता. आम्ही तिथे बराच वेळ होतो. चार तासांनी त्याने मास्क काढला, तेव्हा तो हिंदुस्तानी-पंजाबी असल्याचं जाणवलं. तुम्ही भारतातून आलात का, असं मी विचारताच त्याने उत्तर न देताच धूम ठोकली. एक भारतीय इटलीतील छोट्याशा गावात काय करतोय आणि तो पळून का गेला? हे प्रश्न मला सतावू लागले. स्थनिकांशी बोलल्यावर समजलं की तिथे बरेच पंजाबी बेकायदेशीररीत्या आलेले आहेत. आठवडाभर मिळेल ते काम करून विकेंडला पुतळे बनून पैसे कमावतात. माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. तो किस्सा तिथेच संपला. काही महिन्यांनी मी पंजाबमधील काही घरांवर खूप मोठं विमान लावल्याचा फोटो पाहिला. त्याचंही नवल वाटलं. माहिती काढल्यावर सत्य समजलं आणि तिथून रिसर्च सुरु केला. बऱ्याचदा पंजाबला गेलो. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच तिथे परदेशात जाण्याचं फॅड होतं असं समजलं आणि कहानी युनिक असल्याने 'डंकी' बनवण्याचा निर्णय घेतला.
- 'डंकी'ची कथा शैली तुमच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळी का आहे?प्रत्येक कथा सांगण्याची शैली वेगळी असते. 'डंकी'ची कथा साध्या पद्धतीने सांगणे गरजेचं असल्याने 'डंकी'ची स्टाईल थोडी वेगळी आहे. तोचतोचपणा येऊ नये यासाठी वेगळ्या शैलीत कथा सांगितली आहे. 'पीके' आणि 'संजू'च्या वेळीही सुरुवातीला काही जणांनी नावं ठेवली, पण नंतर त्यांना ते चुकीचे असल्याची जाणीव झाली.
- शाहरुखला मुख्य भूमिकेत घेण्याचं कधी ठरलं?बऱ्याच वर्षांपासून आम्हा दोघांना एकत्र काम करायचं होतं. 'मुन्नाभाई'ची स्क्रीप्टही शाहरुखने वाचली होती. त्यांनाही काम करण्याची इच्छा होती, पण ते स्पाईन सर्जरीसाठी गेल्याने एकत्र काम करू शकलो नाही. नंतर भेटीगाठी झाल्यावर सिनेमाबाबत चर्चा व्हायची. त्यांना ही कथा आवडली. कोरोनाच्या काळात कथा डेव्हलप होत असताना शाहरुखही सोबत होते. सुरुवातीपासून कथा ऐकल्याने त्यांनी काम करायला होकार दिला. ते खूप प्रेमळ असल्याने काम करताना मजा आली.
- सुखीचं कॅरेक्टर कुठून आलं आणि यासाठी विकीलाच का घेतलं?पडद्यावर ज्या व्यक्तिरेखा दाखवल्या त्यांच्यापेक्षा भयंकर घटना वास्तवात घडलेल्या आहेत. कथा एकाच व्यक्तीची नसते, तर बऱ्याच जणांच्या कथा एकत्र करून एक व्हर्जन बनवलं जातं. सुखीचं कॅरेक्टर लिहिताना विकीचा विचार केला नव्हता. विकीचे वडील अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशलना स्टोरी समजावून सांगताना सुखीच्या रोलसाठी विकी असता तर मजा आली असती असं मस्करीत म्हटलं, पण मी त्याला हा रोल ऑफर करणार नसल्याचंही त्यांना सांगितलं. कारण तो सध्या मुख्य भूमिका साकारत असताना त्याला या रोलसाठी विचारणं चुकीचं ठरेल. विकीसोबत सनी असता तर आणखी मजा आली असती असंही म्हणालो. त्याच रात्री विकीचा फोन आला. तो म्हणाला की, तुमच्याकडे रोल आहे आणि मी तो करणार नाही असा तुम्ही विचारसुद्धा कसा करू शकता? तो काहीही करायला तयार होता. अशाप्रकारे विकीची एंट्री झाली.
- नुकतेच फ्रान्समधून भारतात विमान परत पाठवल्याच्या घटनेला सिनेमाशी कसे रिलेट कराल?प्रत्येक महिन्यात अशा घटना घडतात. 'डंकी' आल्याने यावेळी त्या बातमीकडे आपलं लक्ष वेधलं गेलं. इतकी माणसं तिथून बॉर्डर क्रॉस करू पाहात होते, पण त्यापूर्वी पकडले गेले आणि त्यांना परत पाठवले. चित्रपटात दाखवलेल्या १९९५च्या पद्धतीपेक्षा सध्या 'डंकी' मारण्याची पद्धत बदलली आहे. सध्या युरोपच्या आजूबाजूच्या व्हिजाची गरज नसलेल्या छोट्याशा देशात हे लोक पोहोचतात आणि तिथून डंकी मारतात. फ्रान्समध्ये घडलेला प्रकारही असाच आहे.
- शाहरुखसोबत तापसीच का?तापसी एक चांगली अभिनेत्री असून, पंजाबी चांगली बोलू शकते. ती एखाद्या छोट्याशा गावातील पंजाबी मुलगी वाटू शकते. त्यामुळे ती या रोलसाठी परफेक्ट वाटली. इथे खरंतर पंजाबी बोलण्याचं आव्हान शाहरुखसमोर होतं. दोघांची जोडी छान जमली आहे.
- या चित्रपटामुळे समाजव्यवस्थेत काही बदल घडू शकेल?बदल घडेल की नाही सांगू शकत नाही, पण चर्चा तर सुरू झाली आहे. फिल्ममेकर या नात्याने एक दबलेली गोष्ट समोर आणण्याचं काम करू शकतो. पॅालिसी बदलायची की नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्या मागे खूप गोष्टी असतात.