सनी देओलचा ‘गदर २’ प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदरचा हा सीक्वल आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'गदर २'च्या यशानंतर सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी लोकमतशी खास संवाद साधला.
अनिल शर्मा यांनी ‘गदर २’बद्दल बोलताना या सिनेमाच्या यशामागचं कारणंही स्पष्ट केलं. ‘गदर २’ नंतर आर्मीतील कुटुंबीयांचे फोन आल्याचंही अनिल शर्मा यांनी या मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, “‘गदर’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अंगावर शहारा यायचा. तर ‘गदर २’मधून पिता-पुत्राच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा चित्रपट म्हणजे एक फॅमिली ड्रामा आहे. सध्याच्या चित्रपटांत, ओटीटीवर अशा बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात, ज्या तुम्ही संपूर्ण कुटुंबियांबरोबर एकत्र बसून पाहू शकत नाही. ‘गदर २’मध्ये असं काहीही नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अनेक महिला आणि आर्मीतील कुटुंबीयांचे फोन आले. या चित्रपटातील देशभक्ती लोकांना विशेष भावली.”
दरम्यान, ‘गदर २’ चित्रपटात सनी देओलसह अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, रुमी खान या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. गदरमधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. लवकरच हा चित्रपट ५०० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.