Join us

Exclusive: ‘गदर २’, अमिषा पटेलची नाराजी आणि संगीतकाराचे आरोप; दिग्दर्शक अनिल शर्मा यांची सडेतोड उत्तरं

By कोमल खांबे | Published: September 02, 2023 4:49 PM

Gadar 2 : 'गदर २'च्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला.

बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांच्या सीक्वलचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. २००१ साली सुपरहिट ठरलेल्या सनी देओलच्या 'गदर : एक प्रेम कथा' सिनेमाचा सीक्वल तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 'गदर'प्रमाणेच 'गदर २'नेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची ५०० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 'गदर २'च्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला.

२२ वर्षांनी ‘गदर’चा सीक्वेल का काढावासा वाटला?

‘गदर’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या सीक्वेलचा काही प्लॅन नव्हता. पण, त्यानंतर केवळ देशातच नव्हे तर परदेशातही मला ‘गदर २’ बाबत विचारणा होत होती. गदरचा सीक्वेल यावा, ही प्रेक्षकांची इच्छा होती. या चित्रपटात तारा सिंहच्या मुलाची जीतेची भूमिका साकारलेला माझा मुलगा उत्कर्षही मोठा होत होता. त्यामुळे मला ‘गदर २’ काढायचा होता. मला गदर २मधून उत्कर्षला लॉन्च करायचं होतं, पण, चांगली कथा मिळत नव्हती. गदर २साठी तेव्हा चांगली कथा मिळाली असती तर कदाचित जिनियस हा चित्रपटही बनला नसता. तारा सिंह पुन्हा पाकिस्तानात का जाईल? याचं मुख्य उद्दिष्ट मला सापडत नव्हतं. एके दिवशी नवरात्रीत चित्रपटाचे लेखक शक्तिमान तलवार माझ्याकडे आले आणि त्यांनी मला गदर २ची ही कथा सांगितली. गदरचं रामायणाशी आणि गदर २चं महाभारताशी कनेक्शन आहे. चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला वाचवण्यासाठी जर तेव्हा अर्जूनला पोहोचता आलं असतं, तर पुढचं महाभारत घडलंच नसतं. यावर आधारितच ‘गदर २’ची कथा होती. कथा आवडल्यामुळे मी' गदर २' बनवण्याचा निर्णय घेतला.

‘गदर २’मध्ये ५० वर्षांपूर्वीचा काळ दाखविण्यात आला आहे. शूटिंग करताना यासाठी काय काळजी घेण्यात आली होती?

तारा सिंहचं घर कसं असेल? इंग्रजी बेलणाऱ्या सकिनाचं लाइफस्टाइल कसं असेल? या सगळ्याचा विचार करुनच आम्ही सेट डिजाइन केला होता. शूटिंग भलेही आताच्या टेक्नोलॉजीने झालं असेल. पण, ५० वर्षांपूर्वीच्या गोष्टी दाखवताना आम्ही बरीच काळजी घेतली होती.

‘गदर’मध्ये सनी देओलची एन्ट्री कशी झाली?

'गदर'मधील तारा सिंहच्या व्यक्तिरेखेत माझ्या डोळ्यासमोर सनी देओलच येत होता. तारा सिंहच्या भूमिकेत मला दुसरा कोणताच अभिनेता दिसत नव्हता. त्यामुळे या भूमिकेसाठी मी सनी देओललाच मुख्य भूमिकेत घेण्याचं ठरवलं होतं.

‘गदर २’च्या यशामागचं कारण काय?

‘गदर’ची कथा भावनिक होती. तारा सिंह आणि जीते या दोन व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. ‘गदर’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अंगावर शहारा यायचा. त्यामुळे ‘गदर २’मधून पिता-पुत्राच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांना भावला. दुसरं म्हणजे हा चित्रपट म्हणजे एक फॅमिली ड्रामा आहे. सध्याच्या चित्रपटांत, ओटीटीवर अशा बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात, ज्या तुम्ही संपूर्ण कुटुंबियांबरोबर एकत्र बसून पाहू शकत नाही. ‘गदर २’मध्ये असं काहीही नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अनेक महिला आणि लष्करी कुटुंबातील अनेकांचे फोन आले. या चित्रपटातील देशभक्ती लोकांना विशेष भावली. जीतेची लव्हस्टोरीही एकदम साधी आहे. ‘गदर २’मधील गाणी आणि चित्रपटातील संगीतही लोकांना आवडलं. यामुळे ‘गदर २’सुपरहिट ठरला, असं मला वाटतं.

‘उड जा काले कावा’ आणि ‘मै निकला गड्डी लेके’ ही गाणी चित्रपटात दाखवण्यासाठी मला विचारलं नसल्याचं उत्तम सिंह यांचं म्हणणं होतं, याबद्दल काय सांगाल?

जेव्हा एखाद्या चित्रपटातील गाणी दुसऱ्या चित्रपटात वापरायची असतात, तेव्हा त्या म्युझिक कंपनीकडून गाण्याचे राइट्स घ्यावे लागतात. ‘उड जा काले कव्वे’ आणि ‘मै निकला गड्डी लेके’ ही दोन्ही गाणी झी स्टुडियोची आहेत. त्यामुळे ‘गदर २’मध्ये ही गाणी वापरण्यासाठी त्यांच्याकडून आम्ही परवानगी घेतली होती.

‘गदर २’च्या शूटिंग दरम्यान घडलेल्या प्रसंगांमुळे अमिषा पटेलने नाराजी व्यक्त केली होती, याबद्दल काय सांगाल?

माझी अमिषावर कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. तिच्या मनात काय आहे, ते मला माहीत नाही. पण, ती माझ्यासाठी सकीना होती आणि आजही आहे.

‘गदर ३’ कधी येणार?

‘गदर २’च्या शेवटी आम्ही ‘To be continue...’ असं म्हटलं आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्ही ‘गदर ३’बद्दलही नक्कीच बोलू.

अनेक मराठी कलाकारांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. याबद्दल काय सांगाल?

दादासाहेब फाळके या मराठी माणसाने बॉलिवूड बनवलं आहे. मराठी कलाकार तर खूपच कमाल आहेत. मी अनेक मराठी कलाकारांबरोबर काम केलं आहे. नाना पाटेकर एक उत्तम अभिनेता आहेत. श्रद्धांजली चित्रपटाच्या निमित्ताने सुलोचन लाटकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मराठी सारखं साहित्य दुसऱ्या कोणत्याच भाषेत नाही. आता अनेक मराठी साहित्य हिंदीतही भाषांतरित करण्यात आलं आहे.

‘गदर २’च्या यशानंतर ९०च्या दशकातील अनेक चित्रपटांचे सीक्वेलचा ट्रेंड येईल, असं वाटतं का?

बॉलिवूडमध्ये आता सीक्वेलचा ट्रेंड आहे. एवढ्या वर्षांत एका महिन्यात एवढं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर कधीच झालं नव्हतं जेवढे ऑगस्ट महिन्यात झालं आहे. त्यामुळे ट्रेंडचा विचार न करता चांगल्या कथा असलेले चित्रपट बनवले पाहिजेत.

 

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडअमिषा पटेल