दिग्दर्शक मधुर भांडारकर वास्तववादी सिनेमांसाठी ओळखले जातात. वास्तविक आयुष्यांवरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. यात फॅशन, हिरोईन, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट अशा अनेक सिनेमांचा उल्लेख करता येईल. हेच मधुर भांडारकर पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपट घेऊन आले आहेत. तेही महिला बाउंसरच्या जीवनावर आधारित. या सिनेमाचं नाव आहे 'बबली बाउंसर'. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
- तेजल गावडे
महिला बाउंसरवर चित्रपट बनवण्याचा निर्णय का घेतला?- वास्तविक जीवनात मी खूप विनोदी व्यक्ती आहे. चांदनी बार नंतर लोकांचं मत बनलं की मला डार्क सिनेमा आवडतात. पण जेव्हा मला महिला बाउंसरची कंसेप्ट सुचली आणि त्यावर कॉमेडी आणि हलकाफुलका चित्रपट बनवायचा ठरवला. हा वेगळा विषय आहे. मला वाटलं की, बाउंसरचं जग दाखवलं पाहिजे. तेदेखील इंटरेस्टिंग आहे. कसे ते गावांतून शहरात येतात आणि तिथे कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जातात, हे सिनेमातून दाखवायचे होते. तसेच यात सामाजिक संदेशही मिळणार आहे.
बबलीच्या भूमिकेसाठी तमन्ना भाटियाची निवड का केली?- तमन्ना भाटियाचा मी बाहुबली सोडला तर तिचा कोणताच सिनेमा पाहिलेला नाही. पण, तिला पाहून मला ती बबलीच्या भूमिकेसाठी योग्य वाटली. त्यानंतर मी तिला भेटलो. तिच्याशी बोललो. मग तिला बबलीच्या रोलसाठी फायनल केले. तिने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. तिच्यासाठी हा सिनेमा गेम चेंजर ठरू शकतो. तिने आतापर्यंत अशी भूमिका कधीच रुपेरी पडद्यावर साकारली नव्हती. ती उत्तम अभिनेत्री आहे आणि तिने बरेच कामदेखील केलेले आहे. मात्र तिला आतापर्यंत हवे तसे यश मिळालेले नाही. पण बबली बाउंसर सिनेमा तिच्या करिअरला कलाटणी देईल अशी आशा आहे.
तमन्ना भाटियासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- खूप चांगला अनुभव होता. तमन्ना खूप चांगली अभिनेत्री तर आहेच. पण ती व्यक्ती म्हणूनही खूप चांगली आहे. सेटवर सर्वांसोबत मिळून मिसळून राहत होती. ती खूप प्रोफेशनल आहे.
साउथ सिनेइंडस्ट्रीतील कलाकार बॉलिवूडकडे वळताना दिसत आहेत, यावर तुमचं काय मत आहे?- मी चित्रपटांकडे कलाकृती म्हणून पाहतो. साउथचे कलाकारदेखील भारतीय आहेत. त्यामुळे मी कलेची वर्गवारी नाही करत. चित्रपटाला कोणतीच सीमा नसते. वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पाहिले पाहिजेत. मी स्वतःदेखील पाहतो. मला वाटतं आज चित्रपटसृष्टी एक झालीय. आपण त्यांचे डब झालेले चित्रपट पाहतो आणि ते आपले चित्रपट डब करून पाहतात. बबली बाउंसर हिंदी शिवाय तमीळ, तेलगूमध्ये डब केलाय. ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. २ कोटींहून जास्त लोकांनी ट्रेलर पाहिला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.