Exclusive : माझं तोंड काळं करून इतिहास बदलला जाणार नाही : मधुर भांडारकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2017 1:02 PM
‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल तर ...
‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल तर ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. माझं तोंड काळं करून किंवा अंगावर शाई फेकून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘लोकमत- सीएनएक्स मस्ती’शी बोलताना दिली. पुण्यानंतर नागपूर येथेही कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद उधळून लावली. ते आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपूरला आले होते. परंतु पत्रकार परिषद न घेताच त्यांना माघारी परतावे लागले. याविषयी ‘लोकमत- सीएनएक्स मस्ती’ने त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘मी सुरुवातीपासूनच काही गोष्टी स्पष्ट करीत आलो आहे. चित्रपटात पूर्ण इतिहास दाखविलेला नाही. ट्रेलर बघून जर हे सगळं होत असेल तर ते दुर्दैवी आहे. मी लोकशाहीप्रधान देशात राहतो. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अशात जर माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल तर दुर्दैवी आहे. खरं तर कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विरोध अनाठायी आहे. पुणे आणि आता नागपूरमध्येही मला अशा दुर्दैवी अनुभवाचा सामना करावा लागल्याने, मला धक्का बसला आहे. ALSO READ : पुण्यानंतर नागपुरातही ‘इंदू सरकार’ला विरोध; मला अभिव्यक्ती स्वातंत्र नाही काय? मधुर भांडारकरचा सवाल!!वास्तविक आणीबाणी या विषयावर आतापर्यंत प्रचंड लिखाण झाले आहे. चर्चाही घडून आणल्या आहेत. मग मलाच विरोध का? माझ्या अंगावर शाई फेकून किंवा माझे तोंड काळे करून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले. आगामी काळातही ‘इंदू सरकार’ला विरोध होऊ शकतो, अशात तुमचा पवित्रा काय असेल? असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, मी सुरक्षेच्या दृष्टीने विचार करीत असल्याचे म्हटले. ‘इंदू सरकार’ला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ट्रेलर बघून प्रेक्षक विशेषत: तरुण प्रेक्षक चित्रपटाविषयी उत्सुक आहेत. त्यामुळे हा चित्रपट कुठल्याही अडथळ्यांविना २८ जुलैलाच रिलीज व्हावा म्हणून मी सुरक्षेच्यादृष्टीने विचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘इंदू सरकार’च्या प्रमोशनसाठी मधुर भांडारकर नागपूरला आले असता, कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली. त्यामुळे त्यांनी लगेचच हॉटेलमधून काढता पाय घेत विमानतळ गाठले. ही बाब कॉँग्रेस कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी मधुर भांडारकर यांचा माग काढत विमानतळापर्यंत पाठलाग केला. मधुर भांडारकर यांच्यावर शाई फेकण्याचा त्यांचा इरादा होता.