Join us

Exclusive : ‘न्यूटन’ आॅस्करसाठी डिझर्व्ह करणारा चित्रपट : अंजली पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 1:07 PM

सतीश डोंगरे पूर्वी मी, आई, बहीण आणि कुटुंबातील इतर मंडळी टीव्हीसमोर बसून आॅस्कर सेरेमनी बघायचो. आम्हाला फिल्मफेअरपेक्षाही आॅस्कर सेरेमनीचे ...

सतीश डोंगरे पूर्वी मी, आई, बहीण आणि कुटुंबातील इतर मंडळी टीव्हीसमोर बसून आॅस्कर सेरेमनी बघायचो. आम्हाला फिल्मफेअरपेक्षाही आॅस्कर सेरेमनीचे खूप आकर्षण होते. पुढे मी जेव्हा प्रत्यक्ष अभिनयाला सुरुवात केली, तेव्हा चेष्टामस्करीत कुटुंबातील सर्वच मंडळी मला ‘आता आॅस्कर घेऊन ये’ असे म्हणायचे. त्यावेळी कुटुंबीयांकडून चेष्टामस्करीत व्यक्त केली जात असलेली अपेक्षा आज प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे. मात्र मी अपेक्षांचे ओझे घेऊन पुढे जाणार नाही. अजून बºयाचसा पल्ला गाठायचा आहे. परंतु एक मात्र नक्की सांगू शकेल की, ‘न्यूटन’ आॅस्करसाठी डिझर्व्ह करणारा चित्रपट आहे, असे मत ‘न्यूटन’ अभिनेत्री अंजली पाटील हिने व्यक्त केले. ‘न्यूटन’ची आॅस्करसाठी निवड झाली असता अंजलीशी साधलेला संवाद...- आॅस्करसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी भारताकडून निवड झालेल्या चित्रपटात तुझी प्रमुख भूमिका आहे, यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय सांगशील?ही बाब खरोखरच अभिमानास्पद आहे. वास्तविक प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात आॅस्करचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्काराच्या रेसमध्ये माझी भूमिका असलेल्या चित्रपटाची निवड होणे माझ्यासाठी हुरूप आणि प्रेरणा देणारे आहे. खरं तर दुसरी आनंदाची बाब हीदेखील आहे की, तुमचा चित्रपट जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या स्पर्धेमध्ये तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जेव्हा अशा चित्रपटांमध्ये तुम्ही काम करता तेव्हा तुमचे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचते, असे मी समजते. - आॅस्करच्या रेसमध्ये ‘न्यूटन’ कुठवर मजल मारेल, असे तुला वाटते?खरं सांगायचे झाल्यास ‘न्यूटन’ आॅस्करसाठी डिझर्व्ह करणारा चित्रपट आहे. त्यामुळे आॅस्करच्या रेसमध्ये ‘न्यूटन’ चांगली मजल मारेल, असे मला मनापासून वाटते. ‘न्यूटन’ला आता इतर देशांतील चित्रपटांना फाइट द्यावी लागणार आहे. मला असे वाटते की, ‘न्यूटन’ची कथा सर्वोत्कृष्ट आहे, त्यामुळे चित्रपट मूल्यमापन समितीतील सदस्यांना ‘न्यूटन’ भावेल यात शंका नाही. त्याचबरोबर आणखी एक परखड सत्य सांगायचे झाल्यास, ‘न्यूटन’ला जे काही आगामी काळात पुरस्कार मिळतील ते त्याच्यातील दर्जावर अवलंबून असेल. कारण ‘न्यूटन’ला पुरस्कारासाठी वशिलेबाजी करायची गरज भासणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. - ‘न्यूटन’ने आॅस्कर आणावा, अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे, याचे तुला दडपण वाटत आहे काय?नाही, न्यूटनने आॅस्कर आणावा, अशी मला मनोमन अपेक्षा आहे; परंतु त्याचे ओझे मी बाळगत नाही. आम्ही सर्वोत्कृष्ट चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. आता लोकांनी त्यास बघून आमच्या कामाचे मूल्यमापन करायला हवे. खरं तर आॅस्करसाठी माझा चित्रपट निवडला गेल्याचा मला प्रचंड आनंद आहे. परंतु या यशाने हरकून जावे, असे अजिबातच नाही. कारण मी असे समजते की, ही माझी सुरुवात आहे. मला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.  - ‘माझ्या अंजूला सगळं काही मिळालं आता आॅस्कर हवा’ असे तुझी आई म्हणायची, यावर तुझी प्रतिक्रिया काय?आईचे प्रेम सदैव माझ्या पाठीशी आहे. आपल्या मुलीने उंच भरारी घ्यावी, असे प्रत्येक आईला वाटत असते. कारण सायकलवर शाळेत जाणारी मुलगी आज आॅस्करपर्यंत पोहोचल्याने तिचे मन भरून आले आहे. खरं तर माझ्या अभिनयाच्या प्रवासात आईचे पाठबळ आणि तिचे मार्गदर्शन मला पावलोपावली कामी आले आहे. जेव्हा आम्ही घरात टीव्हीसमोर बसून आॅस्कर सेरेमनी बघायचो तेव्हा माझी आई म्हणायची की, ‘माझ्या अंजूला सगळं काही मिळालं आता आॅस्कर हवा’ माझी बहीणही असेच म्हणायची. अर्थात त्यावेळेस त्या चेष्टामस्करीत म्हणायच्या. परंतु आज ते सत्यात उतरताना दिसत आहे. -  तुझ्या आगामी चित्रपटांविषयी काय सांगशील?राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘मेरे प्यारे प्राइममिनिस्टर’ या चित्रपटात मी काम करीत आहे. त्याचबरोबर सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘काला करिकलन’ या चित्रपटातही माझी प्रमुख भूमिका आहे. याव्यतिरिक्त मी ‘निंबो’ नावाच्या चित्रपटात काम करीत आहे. त्याचबरोबर मी सैराट फेम नागराज मंजुळे यांच्यासोबत ‘द सायलेंस’मध्ये काम करीत आहे. हा माझा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.