मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)साठी २०२२ हे वर्ष अतिशय धमाकेदार राहिले आहे. त्याने 'पुष्पा' (Pushpa Movie) या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला अर्थात पुष्पाला हिंदीत आवाज दिला. हा आवाज आणि त्यातील डायलॉग अतिशय लोकप्रिय झाला. अनेकजण त्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागले. हिंदी सिनेमाप्रेमींनी तर श्रेयसच्या आवाजाची तोंडभरून स्तुती केली होती. त्यामुळे श्रेयसचे चाहते पुन्हा एकदा त्याचा पुष्पाच्या सीक्वेलमध्ये आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. दरम्यान आता लोकमतला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने पुष्पा २(Pushpa 2)बाबत नवीन अपडेट दिली आहे.
श्रेयस म्हणाला की, पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरू झाले आहे. पण अद्याप माझ्याशी अधिकृत काहीही चर्चा झालेली नाही. पहिल्या भागाला जो रिस्पॉन्स मिळाला आणि अजूनही जे प्रेम मिळत आहे, त्यासाठी प्रेक्षकांचे मी खूप आभार मानतो. माझ्यासाठी हे खूप अविश्वसनीय होते. माझे स्वप्न सत्यात उतरले असंही मी म्हणू शकत नाही. कारण मी असं काही होईल याचा विचारदेखील केला नव्हता. पुष्पा २चा एक भाग व्हायला मलासुद्धा नक्कीच आवडेल. पण जोपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खात्रीपूर्वक काहीच सांगू शकत नाही. यासंदर्भात माझ्याशी बोलणे झाल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेन.
पुष्पानंतर श्रेयसला साउथच्या चित्रपटांच्या डबिंगच्या बऱ्याच ऑफर्स आल्या होत्या. याबद्दल तो म्हणाला की, पुष्पानंतर मला साऊथच्या चित्रपटाच्या डबिंगसाठी खूप ऑफर्स आल्या. पण कुठेतरी मला वाटलं की विशेषत्व (Exclusivity) असावे. काही रोल्स तसेच होते. काहींना तशाच पद्धतीचा आवाज हवा होता. पुष्पानंतर लगेच तसेच काही करणे मला योग्य वाटले नाही. जर काही इंटरेस्टिंग ऑफर आली तर नक्की करेन.
साऊथच्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी काही ऑफर्स आल्या का, असे विचारल्यावर श्रेयस म्हणाला की, सिनेमाच्या हव्या तशा भूमिकेच्या ऑफर्स आल्या नाहीत. पण मराठीत इंटरेस्टिंग काम सुरु आहे. मग ते अॅक्टिंगमध्ये असो किंवा प्रोडक्शनमध्ये. याबाबतीत मी खूप उत्सुक आहे. कारण मराठीते जे एक्सायटिंग काम होतंय आणि वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत, ते काम लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. बरेच इंटरेस्टिंग काम सुरू आहे त्याची पण लवकरच घोषणा करू.