हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता चरित्र अभिनेता, खलनायक, विनोदी, गंभीर अशा विविध स्वरुपातील भूमिका अनुपम खेर यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. त्यामुळे रसिकांच्या मनात अनुपम खेर यांचं वेगळं स्थान आहे. बॉलीवुड ते हॉलीवुड असा प्रवास करणारे आणि रसिकांचे लाडके असलेले अनुपम अंकल यांचा आजवरील जीवनप्रवास सोपा नव्हता. त्यांनाही करियरमध्ये बरंच स्ट्रगल करावं लागलं. मात्र त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला ज्याचा विचार कुणीही करुच शकत नाही. याबाबत एक किस्सा अनुपम खेर यांनी एका शोमध्ये सांगितला.
'सांराश' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता.करियरच्या ऐन भरात असताना आणि विविध सिनेमा हातात असताना एक बाका प्रसंग अनुपम खेर यांच्यावर ओढवला. 'हम आपके कौन' या सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा)चा झटका आला होता. त्याबाबतची आठवण अनुपम खेर यांनी या शोमध्ये सांगितली. एकदा अनुपम खेर हे अनिल कपूरच्या घरी जेवायला गेले होते. त्यावेळी अनिल कपूर यांच्या पत्नीच्या लक्षात आले की अनुपम खेर यांच्या एका डोळ्याच्या पापण्या हालचाल करत नाहीत. त्यानंतर ते घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करत असताना तोंडातून पाणी येऊ लागलं. हे पाहून काहीच समजलं नाही आणि तात्काळ यश चोप्रा यांच्याशी संपर्क साधला असं खेर यांनी सांगितलं.
यशजींनी त्यावेळी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांकडे गेलो तेव्हा पॅरालिसिसचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता.मात्र डॉक्टरकडून तपासणी झाल्यानंतर अनुपम खेर थेट 'हम आपके कौन' सिनेमाच्या शुटिंगसाठी पोहचले. अनुपम खेर यांचा वाकडा झालेला चेहरा पाहून कुणालाच काही समजलं नाही. सलमान खान आणि माधुरीला तर वाटले की ते मस्करी करत आहेत. मात्र सत्य सांगितल्यानंतर सिनेमाची टीम हादरली होती. मात्र अशा परिस्थितीतही अनुपम खेर यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. सिनेमाचं शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
चेहरा वाकडा असतानाही त्यांनी 'हम आपके है कौन' सिनेमाचं शुटिंग केलं. त्यामुळेच या सिनेमाच्या सीन्समध्ये अनुपम खेर यांचा क्लोज शॉट घेण्यात आलेला नाही. एका सीनमध्ये मात्र अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचं सिनेमा पाहताना दिसतं. या सिनेमातील एका सीनमध्ये अनुपम खेर यांनी शोलेतील धर्मेंद्रच्या वीरुप्रमाणे दारु प्यायल्याची एक्टिंग केली होती. या सीनमध्येच फक्त अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचं दिसतं. मात्र त्या कठीण परिस्थितीतही जे धैर्य आणि जिद्द अनुपम खेर यांनी दाखवली त्यामुळेच त्या सीनमध्ये चेहरा वाकडा असूनही ते एक्टिंगच करत असल्याचे आजही रसिकांना वाटतं.