लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह याला सोमवारी महाराष्ट्र सायबर सेलने सोमवारी चौकशीसाठी बोलावले. फेअरप्ले नावाचे ॲप कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही आयपीएल दाखवत असल्याचा आरोप वायकॉम या कंपनीने केला आहे. या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने फेअरप्ले डिजिटलवर कॉपीराइटचा गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे.
फेअरप्ले ॲप हे बेटिंग ॲप आहे. या ॲपवर विनापरवाना परवानगीशिवाय आयपीएल मॅच दाखविण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर वायकॉम या कंपनीने सायबर सेलशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. बादशाहने फेअर प्लेची जाहिरात केली होती, त्यामुळे त्याला सायबर चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी बॉलिवूडमधील ४० कलाकारांना समन्स बजावले जाऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सेलिब्रिटींना सामान्य लोक फॉलो करतात. त्यामुळे सेलिब्रिटी ज्या जाहिराती करत असतात, त्याचा परिणाम प्रेक्षकांवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे पाेलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित कंपन्या आणि कलाकारांना नोटीस बजावत चौकशी सुरू केली आहे. बादशाहचे वकील प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी बादशाहला समन्स देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार बादशाह चौकशीसाठी हजर झाला होता.